आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकवर हुकुमत गाजवणारा "सार्थक'

नरेश हाळणोर
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

सार्थक साखला याची आई मंजूषा साखला या एरोबिक्‍स करायच्या. त्यामुळे त्यानेही कुठल्या तरी खेळात सहभाग घ्यावा, असे त्यांना नेहमीच वाटायचे. गोविंदनगर येथील न्यू इरा इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता पाचवी वर्गात शिकत असताना त्याने जिम्नॅस्टिक या खेळात सहभाग घेण्याचा विचार केला. अर्थात, त्याला त्याच्या आईची त्यासाठी मदत झाली. सुरवातीला काही दिवस त्याने यशवंत व्यायामशाळेत जिम्नॅस्टिकचे प्रात्यक्षिक पाहिले होते. त्यामुळे किंचितशी माहिती त्याला होती. शाळेत जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षक प्रबोधन यांच्याकडे त्याचा इयत्ता पाचवीच्या वर्गापासून सराव सुरू झाला.

सार्थक साखला याची आई मंजूषा साखला या एरोबिक्‍स करायच्या. त्यामुळे त्यानेही कुठल्या तरी खेळात सहभाग घ्यावा, असे त्यांना नेहमीच वाटायचे. गोविंदनगर येथील न्यू इरा इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता पाचवी वर्गात शिकत असताना त्याने जिम्नॅस्टिक या खेळात सहभाग घेण्याचा विचार केला. अर्थात, त्याला त्याच्या आईची त्यासाठी मदत झाली. सुरवातीला काही दिवस त्याने यशवंत व्यायामशाळेत जिम्नॅस्टिकचे प्रात्यक्षिक पाहिले होते. त्यामुळे किंचितशी माहिती त्याला होती. शाळेत जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षक प्रबोधन यांच्याकडे त्याचा इयत्ता पाचवीच्या वर्गापासून सराव सुरू झाला. दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्याची पहिली स्पर्धा झाली ती, तो सातवीमध्ये असताना. 12 वर्षांआतील मिनी राज्य स्पर्धेत त्याला पहिल्यांदा संधी मिळाली. त्या वेळी त्याने जिम्नॅस्टिकच्या तीन प्रकारांत कांस्यपदक पटकावले होते. ही त्याची झालेली सुरवात होती.

जिम्नॅस्टिकमध्ये आवड निर्माण व्हावी, खेळाकडे पाहण्याचा खेळाडूंचा दृष्टिकोन सकारात्मक असावा, खेळाडूंना प्रोत्साहन मिळाणे, यासाठी प्रशिक्षक प्रबोधन हे प्रत्येक खेळाडूच्या सरावाचे चित्रीकरण करायचे आणि ते सराव आटोपल्यानंतर त्या त्या खेळाडूंना दाखवायचे. त्यामुळे खेळाडूंना आपल्या चुकलेल्या स्टेप्स सुधारण्यासाठीची संधी जशी मिळायची, तशीच प्रशिक्षक प्रबोधन यांनी राबविलेल्या त्या उपक्रमातून खेळाडूंमध्ये जोश व प्रोत्साहनही मिळायचे.

सार्थक साखला याने इयत्ता बारावीपर्यंत चार राष्ट्रीय स्पर्धांतून शालेय स्पर्धांत महाराष्ट्राकडून प्रतिनिधित्व केले. वैयक्तिक प्रकारात त्याला फारसे यश मिळाले नसले, तरी सांघिक प्रकारात मात्र त्याने महाराष्ट्राला पदक मिळवून दिले. इयत्ता नववीच्या वर्गात त्याला यश आले नाही; परंतु इयत्ता दहावीत असताना आग्रा येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत संघाला कांस्यपदक मिळाले. इयत्ता अकरावीत असताना रौप्य, तर बारावीत असतानाही संघाला रौप्यपदक मिळाले.

इयत्ता दहावीपर्यंत न्यू इरा हायस्कूलमध्येच त्याचा नियमित सराव असायचा. नंतर मात्र आडगावच्या मीनाताई ठाकरे क्रीडासंकुलात प्रशिक्षक प्रबोधन यांच्या क्‍लबकडून त्याचा गेल्या दोन वर्षांपासून सराव सुरू आहे. यासाठी रोज सकाळी-सायंकाळ दोन-दोन तास त्याचा सराव नियमित सुरू असतो. आता त्याला विद्यापीठ स्पर्धांत आपल्या कामगिरीची चुणूक दाखवावी लागणार आहे. आरवायके महाविद्यालयात तो प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असून, यंदा त्याच्यासमोर कडवे आव्हान राहणार आहे, याची त्यालाही जाणीव आहे.

फ्लोअरवर हुकुमत
सार्थक आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये तरबेज आहे. यात सहा प्रकारांत आपले गुणकौशल्य सिद्ध करून दाखवावे लागते. यातही सार्थक फ्लोअर प्रकारात निष्णात झाला आहे. या प्रकारात त्याला हमखास गुण मिळतातच. यातच त्याला आपले स्थान पक्के करायचे आहे. त्यासाठी तो प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सरावही करतो. या खेळात आहाराचेही स्थान महत्त्वाचे आहे. फळे व दूध याचा समावेश त्याच्या आहारात नियमित असतो. नव्हे, तो करणे क्रमप्राप्तच असल्याचे प्रशिक्षकांचे फर्मान आहे.

Web Title: Artistic Gymnastics master sarthak