ऍथलिट्‌सना हव्यात सुविधा व दर्जेदार प्रशिक्षक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

नागपूर : ऍथलेटिक्‍स ही सर्व खेळांची जननी आहे. मात्र, देशात पुरेशा सोयीसुविधा नसल्यामुळे प्रतिभावान असूनही भारतीय ऍथलिट्‌सची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नाही. सुविधांसोबतच दर्जेदार प्रशिक्षक मिळाल्यास भारतीय खेळाडू निश्‍चितच ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने पदके जिंकू शकतात, असे स्पष्ट मत माजी आंतरराष्ट्रीय धावपटू आनंद मेनेझीस यांनी व्यक्‍त केले. खासदार क्रीडा महोत्सवातील ऍथलेटिक्‍स स्पर्धांच्या उद्‌घाटनासाठी नागपुरात आले असता ते बोलत होते.

नागपूर : ऍथलेटिक्‍स ही सर्व खेळांची जननी आहे. मात्र, देशात पुरेशा सोयीसुविधा नसल्यामुळे प्रतिभावान असूनही भारतीय ऍथलिट्‌सची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नाही. सुविधांसोबतच दर्जेदार प्रशिक्षक मिळाल्यास भारतीय खेळाडू निश्‍चितच ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने पदके जिंकू शकतात, असे स्पष्ट मत माजी आंतरराष्ट्रीय धावपटू आनंद मेनेझीस यांनी व्यक्‍त केले. खासदार क्रीडा महोत्सवातील ऍथलेटिक्‍स स्पर्धांच्या उद्‌घाटनासाठी नागपुरात आले असता ते बोलत होते. सिडनी ऑलिंपिकमध्ये 4-100 मीटर रिलेसाठी राखीव खेळाडू असलेले मेनेझीस म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून देशभरातील खेड्यापाड्यांमध्ये जात आहे. या निमित्ताने मला या ठिकाणी भरपूर "टॅलेंट' पाहायला मिळाले. त्यांना योग्य सुविधा व प्रशिक्षण मिळाल्यास ते नक्‍कीच ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवू शकतात. गावांमधील खेळाडूंना शहरात आणण्याऐवजी त्यांना त्यांच्याच ठिकाणी आवश्‍यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. हे काम केवळ सरकारचे नसून, कार्पोरेट्‌स जगतानेही पुढे यायला पाहिजे.  
आगामी आशियाई स्पर्धेतील भारतीयांच्या संभाव्य कामगिरीबद्दल विचारले असता ते म्हणाले, आशियामध्ये भारतीय ऍथलिट्‌सनी नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेतही ते उत्तम कामगिरी करतील यात शंका नाही. देशभरात होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धांवर भाष्य करताना आनंद म्हणाले, अलीकडच्या काळात मॅरेथॉन हा एकप्रकारे व्यवसाय झाला आहे. दरवर्षी भारतात जवळपास 1700 मॅरेथॉन होतात, मात्र त्यापैकी दहा ते बारा स्पर्धांनाच भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाची (एएफआय) मान्यता असते. पर्यायाने महासंघासोबतच राज्य संघटनांनाही हक्‍काच्या पैशापासून वंचित राहावे लागते. हा प्रकार कुठेतरी थांबण्याची गरज आहे. मेनेझीस स्वतः भारतातील दहा शहरात दहा किलोमीटरच्या शर्यती आयोजित करतात, हे विशेष.
... तर वसुधा पदक मिळवू शकली असती
आनंद मेनेझीस यांनी नागपूर आणि विदर्भाच्या ऍथलिट्‌सची स्तुती केली. ते म्हणाले, नागपूर आणि विदर्भातील अनेकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या. माझ्या काळात चंद्रपूरच्या वसुधा मोरेला मी एका शिबिरामध्ये जवळून पाहिले होते. तिने 1995 चे भोपाळ "नॅशनल' गाजविले होते. वसुधामध्ये खूप गुणवत्ता होती. योग्य मार्गदर्शन मिळाले असते तर, नक्‍कीच ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवू शकली असती.
 

 

Web Title: Nagpur news- Athletes needs basic facilities