भारतीय बॅडमिंटनपटूंनी बर्लिनमध्ये दिला दहावीचा पेपर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

विद्यार्थ्यांनी रुग्णालयातून उत्तरपत्रिका लिहिल्याची उदाहरणे आहेत. मात्र, इतर देशांत परीक्षा देण्याची ही भारतीय क्रीडापटूची पहिलीच वेळ आहे. रितिका व सिमरन दोघी एक-दोन दिवसांत भारतात परत येणार आहेत. त्यानंतर 15 मार्च रोजी होणारा दुसरा पेपर त्या देतील.

नागपूर : जर्मन कनिष्ठ खुली ओपन बॅडमिंटन स्पर्धा आणि 'आयसीएसई'चा (इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्‍झामिनेशन) बोर्डाचा दहावीचा इंग्रजीचा पेपर एकाच वेळी येत असल्याने नागपूरची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू रितिका ठक्कर आणि तिची मुंबईची दुहेरीतील सहकारी सिमरन सिंघी यांना स्पर्धेसाठी पाठवावे की नाही, या संभ्रमात दोघींचे पालक होते; पण दोघी स्पर्धेसाठी रवाना झाल्या आणि तिकडे दोघींना पेपरही देता यावा, यासाठी पालकांनी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना सर्व यंत्रणांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि दोघींनी शुक्रवारी (ता.10) बर्लिन येथील भारतीय दूतावासात सकाळी नऊ ते अकरा या वेळेत पेपर सोडविला. 

भारताच्या क्रीडापटूने दुसऱ्या देशातून परीक्षा देण्याची ही पहिलीच घटना ठरली. 
भारतात 17 वर्षे वयोगटात दुहेरीत अव्वल स्थानावर असलेल्या रितिका व सिमरनचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले असले, तरी दहावीची परीक्षा दिल्यामुळे त्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाचणार आहे.

स्पर्धा आणि इंग्रजीचा पेपर एकाच वेळी येत असल्याने रितिकाच्या वडिलांनी चंदादेवी सराफ शाळेचे प्राचार्य केनेथ मेंडोसा यांच्यामार्फत आयसीएसई व्यवस्थापनाशी संपर्क साधला. दोघींसाठी बर्लिनमध्ये पेपर सोडविण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती त्यांनी केली. जिल्हा बॅडमिंटन संघटनेनेही या संदर्भात भारतीय बॅडमिंटन महासंघाशी चर्चा केली. याचा विचार करून भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनीही मदत केली. अखेर नियोजित वेळेत प्रश्‍नपत्रिका बर्लिनला पोचल्या आणि लढतीच्या तीन तास आधी दोघींनी त्या सोडविल्या. 

विद्यार्थ्यांनी रुग्णालयातून उत्तरपत्रिका लिहिल्याची उदाहरणे आहेत. मात्र, इतर देशांत परीक्षा देण्याची ही भारतीय क्रीडापटूची पहिलीच वेळ आहे. रितिका व सिमरन दोघी एक-दोन दिवसांत भारतात परत येणार आहेत. त्यानंतर 15 मार्च रोजी होणारा दुसरा पेपर त्या देतील.

Web Title: Ritika Thakkar Simran Singhi education Badminton ICSE