इंग्लंडमध्ये कोच वर्सेस कॅप्टन सामना रंगू नये हिच सदिच्छा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indian women team

इंग्लंडमध्ये कोच वर्सेस कॅप्टन सामना रंगू नये हिच सदिच्छा!

इंग्लंड (England) दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची (Indian Womem Team) घोषणा करण्यात आली. बीसीसीआयच्या निवड समितीने कसोटी (Test), एकदिवसीय (ODI) आणि टी20 मालिकेसाठी मिताली राज (Mithali Raj ) आणि आणि हरमनप्रित कौर (Harmanpreet Kaur) यांच्या नेतृत्वाखाली संघ निवड केलीय. एकमात्र कसोटी सामन्याने महिला संघाच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर प्रत्येकी तीन-तीन सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिका नियोजित आहे. 2014 नंतर भारतीय महिला संघ कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरणार असून 16 जून पासून या सामन्याला सुरुवात होईल. (indian women team announced for england tour mithali raj vs ramesh powar harmanpreet kaur)

हेही वाचा: 'धोनी निर्दोष'; 10 वर्षानंतर Ian Bell ला कळली चूक

बीसीसीआयने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत भारतीय संघाची घोषणा केली. कसोटी आणि वनडे सामन्यांचे नेतृत्व मिताली राज करणार असून टी-20 सामन्यांची धूरा हरमनीप्रितकडे देण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची निवड होण्यापूर्वी संघाला नवे कोच मिळाले. मिताली राजसोबतच्या वादानंतर डच्चू देण्यात आलेल्या रमेश पोवार यांची पुन्हा एकदा महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर संघाचे कोच आणि कसोटी- वनडे संघाची कॅप्टन मिताली राज यांच्यातील ताळमेळ कसा राहणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरले. या दोघांमधील टोकाचा वाद चव्हाट्यावर आल्यानंतर बीसीसीआयने रमेश पोवार यांची उचलबांगडी केली होती.

हेही वाचा: रमेश पोवार पुन्हा कोच; मितालीने केला होता गंभीर आरोप

आता वादाला कारण उरले नाही

टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये रमेश पोवार यांनी मिताली राजला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नव्हते. त्यानंतर सिनियर खेळाडूला अपमानजक वागणूक दिल्याचा आरोपत मितालीने केला होता. मिताली राज टी-20 प्रकारात खेळण्यास फिट नाही. ती संथ खेळी करते, असा तर्क रमेश पोवारांनी तिला बाहेर बसवताना लावला होता. वादाचे हे प्रमुख कारण होते. मिताली राजने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे जो वाद निर्माण झाला होता ते कारण आता उरलेले नाही. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर कोच-कॅप्टन यांच्यात बिनसणार नाही, अशी आशा करुयात. मतभेद बाजूला ठेवून खेळून भारतीय महिलांनी इंग्लंडचे मैदान गाजवावे, अशीच सदिच्छा भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात असेल.

टेस्ट आणि वनडे संघ

मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर (उप-कर्णधार), पूनम राउत, प्रिया पूनिया, दीप्ति शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, शफाली वर्मा, स्नेह राणा, तान्या भाटिया (विकेट कीपर), इंद्राणी रॉय (विकेट-कीपर), झूलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव.

टी 20 साठी भारतीय महिला टीम

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप-कर्णधार), दीप्ति शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, शफाली वर्मा, ऋचा घोष, हरलीन देओल, स्नेह राणा, तानिया भाटिया (विकेटकीपर), इंद्राणी रॉय (विकेटकीपर), शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधति रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव, सिमरन दिल बहादुर.

असा आहे भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरा

16 जून ते 19 दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात ब्रिस्टलच्या मैदानात एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येईल. 27 जूनला वनडे मालिकेला सुरुवात होईल. 30 जून आणि 3 जुलै रोजी दुसरा आणि तिसरा वनडे सामना खेळवण्यात येईल. टी 20 मालिकेतील पहिला सामना 9 जुलैला नॉर्दन्सच्या मैदानात रंगणार आहे. 11 जुलै (होवे) तील सामन्यानंतर 15 जुलैला चेम्सफोर्डच्या मैदानात भारतीय महिला संघाच्या दौऱ्याची सांगता होईल.

loading image
go to top