
अहिल्यानगर येथे झालेल्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात मोठा गदारोळ झाला होता. याचे पडसाद संपूर्ण कुस्ती वर्तुळात पडले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यातील विजेता पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरल्याने त्याला मानाची गदा देण्यात आली. आता या स्पर्धेतील वादावर महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत.
पृथ्वीराज उपांत्य सामना डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध खेळला होता. पण त्या सामन्यात पंचांनी पृथ्वीराजच्या बाजूने निर्णय दिल्याने त्यावर शिवराजकडून आक्षेप घेण्यात आला आणि त्याने व्हिडिओ रिव्ह्यूची मागणी केली होती. पण ती मागणी पंचांकडून फेटाळण्यात आली. त्यावरून त्याच्यात आणि पंचांमध्ये वाद झाले, त्यादरम्यान त्याने पंचांना लाथही मारली.