80 संघांची स्पर्धा एका दिवसात पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

उपनगर जिल्हा फुटबॉल स्पर्धेतील बोरिवली-अंधेरी विभागातील 17 वर्षांखालील गटाच्या स्पर्धेत 80 संघ होते, पण त्यानंतरही ही स्पर्धा एका दिवसात संपवण्यात आली. ही स्पर्धा संपवण्यासाठी थेट पेनल्टी शूटआऊटचा वापर करण्यात आला.

मुंबई : उपनगर जिल्हा फुटबॉल स्पर्धेतील बोरिवली-अंधेरी विभागातील 17 वर्षांखालील गटाच्या स्पर्धेत 80 संघ होते, पण त्यानंतरही ही स्पर्धा एका दिवसात संपवण्यात आली. ही स्पर्धा संपवण्यासाठी थेट पेनल्टी शूटआऊटचा वापर करण्यात आला.

बोरिवलीच्या सेंट फ्रान्सिस डी आसी शाळेच्या मैदानावर तसेच कांदिवलीतील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. संघातील काही खेळाडूंनी चेंडूला साधा स्पर्शही केला नाही तरी संघ जिंकत आहे. शालेय जिल्हा स्पर्धा हा एक क्रूर विनोद झाला आहे. शाळा या स्पर्धांसाठी कसून तयारी करतात, पण ती उरकलीच जाते, अशी टीका सहभागी संघातील मार्गदर्शकांनी केली.

पेनल्टी शूटआऊटमध्ये नशिबाचा भाग जास्त असतो, हे जगभरातील फुटबॉल मार्गदर्शकांनी मान्य केले आहे. आता नेमके हेच या स्पर्धेत घडले. पेनल्टी शूटआऊटवरच स्पर्धा असल्याने एका मैदानात एकाच वेळी अर्थातच दोन लढतीही झाल्या. या प्रकारच्या स्पर्धा घेऊन भारताची फुटबॉलमधील ताकद कशी उंचावणार, अशी विचारणा करण्यात आली.

मुंबईचा लांबलेला पाऊस तसेच मैदानांची अनुपलब्धता यामुळे आमचाही नाइलाज होतो. एवढेच नव्हे, तर बोरिवली-अंधेरी विभागातील संघ मुंबई शहरातील संघांपेक्षाही जास्त होते. आम्ही ही स्पर्धा ऑगस्टच्या अखेरीस सुरू करण्याचे ठरवले होते, पण पावसामुळे स्पर्धा लांबतच गेली. राज्य शालेय स्पर्धा काही दिवसांवर आली असल्यामुळे आमचाही नाइलाज होता, असे क्रीडा अधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 80 team, tournament finished in one day