Mikhail Tal : "बुद्धिबळातील राजा अखेर स्वगृही परतला"

आज ९ नोव्हेंबर. आठवा बुद्धिबळ विश्वविजेता मिखाईल ताल याचा जन्मदिन.
Mikhail Tal
Mikhail Tal

Mikhail Tal : साऱ्या बुद्धिबळविश्वाला आपल्या जादुई खेळाने आठवा विश्वविजेता मिखाईल ताल याने मोहित केले होते. ९ नोव्हेंबर १९३६ रोजी रीगा येथे जन्मलेल्या या विश्वविजेत्याची मॉर्फी, फिशर, कास्पारोव आणि कार्लसन या खेळाडूंच्या पंगतीत गणना होते. ताल याने बार्सिलोना येथील स्पर्धेत ५ मे १९९२ रोजी आपल्या कारकिर्दीतील अखेरचा पारंपारिक (क्लासिकल) प्रकारातील डाव खेळला.

आजच्या एवढी प्रगत शक्तिशाली 'चेस इंजिन' ताल याच्या काळात निश्चितच नव्हती. यामुळे चेस इंजिनच्या आधारे खोलवर यांत्रिक विश्लेषणाच्या अभ्यासा आधारे गृहपाठ करण्याचा पर्यायच त्या काळात कोणत्या खेळाडूला उपलब्ध नव्हता. प्रत्यक्ष लढतीत पटावर हिशेबी आणि अचूकतेच्या पलीकडील चालींची अपेक्षा चाहत्यांना असते. निकालाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अप्रशस्त असले, तरी पटावर समतोल राखून फसवे डावपेच बेधडक खेळून जर बुद्धिबळपटूंनी प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली, तरच बुद्धिबळ चाहते उत्स्फूर्त आणि मनापासून दाद देतात. 'बुद्धिबळातील थरार' हा निकष जर विचारात घेतला तर आजही प्राधान्याने मिखाईल ताल या बुद्धिबळपटूचे नाव प्राधान्याने पुढे येते.

बार्सिलोना येथील स्पर्धेत ५ मे १९९२ रोजी मिखाईल ताल आपल्या कारकिर्दीतील अखेरचा क्लासिकल प्रकारातील डाव खेळला. ग्रँडमास्टर अकोपियन विरुद्ध पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना, प्रतिस्पर्धी अकोपियन याने काळ्या सोंगट्यानीशी खेळताना 'सिसिलियन बचाव' पद्धतीचा अवलंब केला. ओपनिंगच्या काही चाली नंतर ताल याने अकोपियन पुढे बरोबरीचा प्रस्ताव ठेवला. अकोपियन याने ताल याचा हा प्रस्ताव नाकारला. ३७ व्या चालीला अकोपियन याने हत्तीच्या साहाय्याने ताल याचे 'ए-२' घरातील प्यादे टिपले आणि शह देखील दिला.

ताल याने खोलवर विचार करून 'एफ-२' घरातील आपला राजा 'ई-१' या प्रारंभीच्या पटस्थितीतील मूळ घरात हलवला. या क्षणी अकोपियन याने एकंदर पटस्थितीचा विचार करून डावाचा राजीनामा दिला. कारकिर्दीतील या अखेरच्या चाली बरोबरच मिखाईल ताल या बुद्धिबळातील राजाने संपूर्ण बुद्धिबळविश्वाला प्रदक्षिणा घालून चिरविश्रांतीसाठी स्वगृही येणे पसंत केले. या दृष्टिकोनातून या अखेरच्या राजा 'ई-१' चालीचे महत्व अधोरेखित होते. यानंतर काही दिवसांतच ताल याची तब्येत बिघडली. ताल उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. पुढे अवघ्या दोन महिन्यात म्हणजे २८ जुलै १९९२ रोजी ताल याने लौकिक जगाचा निरोप घेतला. आजही बुद्धिबळात कारकीर्द करणारा प्रत्येक बुद्धिबळपटू ताल याचे असंख्य डाव अभ्यासतो. यातच सर्व काही आले.

विश्वविजेता मिखाईल ताल याचा कारकिर्दीतील अखेरचा क्लासिकल डाव :-

1.e4 c5 2.Nf3 Nc6 3.Bb5 d6 4.O-O Bd7 5.Re1 Nf6 6.c3 a6 7.Ba4

c4 8.d4 cxd3 9.Bg5 e6 10.Qxd3 Be7 11.Bxf6 gxf6 12.Bxc6 Bxc6

13.c4 O-O 14.Nc3 Kh8 15.Rad1 Rg8 16.Qe3 Qf8 17.Nd4 Rc8 18.f4

Bd7 19.b3 Bd8 20.Nf3 b5 21.Qa7 Bc7 22.Qxa6 bxc4 23.b4 Qg7

24.g3 d5 25.exd5 Bxf4 26.Kf2 f5 27.gxf4 Qxc3 28.Qd6 Ba4 29.Rd4

Rg7 30.dxe6 Bc6 31.Ng5 Rxg5 32.Qe5+ Rg7 33.Rd8+ Rxd8 34.Qxc3

f6 35.e7 Ra8 36.Qxf6 Be4 37.Rg1 Rxa2+ 38.Ke1 (1-0)

जगज्जेतेपदाच्या लढतीत खेळाडूंनी गृहपाठाच्या आधारे सादर केलेल्या अनेक नाविन्यपूर्ण कल्पना जरूर पहावयास मिळतात. हे मातब्बर खेळाडूंचे व दोन खेळाडूंच्या संघाचे देखील मोठे खोलवर संशोधन असते. बुद्धिबळ अधिक सुदृढ व सशक्त होण्याच्या दृष्टीने हे भरीव योगदान असते. याचा आदर प्रत्येक बुद्धिबळ चाहत्याला नक्कीच आहे. परंतु जागतिक दर्जाच्या क्लासिकल लढतीतील थरार दिवसेंदिवस कमी होताना दिसतो आहे. हा खरा चिंतेचा विषय आहे. पिछाडी भरून काढण्याच्या दृष्टीने लढतीतील फेऱ्या मर्यादित असणे, क्रीडा क्षेत्रातील सर्व प्रकारची वाढती व्यावसायिकता अशी बरीच करणे यामागे असू शकतात. या पार्श्वभूमीवर आठवा विश्वविजेता ताल प्रमाणे थेट पटावरील थराराची अपेक्षा करणे कदाचित चुकीचे ठरेल. परंतु पक्क्या गृहपाठाच्या आधारे जगज्जेता कास्पारोव जसा चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असे, तसे पण फार अपवादानेच दिसू लागले आहे. कारण ती जोखीम, धाडस अथवा बेधडकपणा अपवाद वगळता कमी होऊ लागलेला दिसतो आहे.

१९९७ मध्ये जगज्जेता कास्पारोव विरुद्ध 'डीप ब्लू' अशी दुसऱ्यांदा लढत झाली. या लढतीत कास्पारोव ३.५ - २.५ गुणांच्या फरकाने पराभूत झाला. या पार्श्वभूमीवर मला गियुसेप्पे पॉंटीग्गिया या थोर इटालियन बुद्धिबळप्रेमी लेखकाने केलेले भाष्य आठवते. त्यांनी म्हटले, "कास्पारोव पराभूत झाल्याने अनेक चाहते निराश झाले. ते निराश झाले याचे कारण म्हणजे, कास्पारोव कॉम्प्युटरला पराभूत करेल अशी त्यांची अपेक्षा होती. या अपेक्षाभंगाने ते निराश झाले. मी तर खेळाडूं पेक्षा बुद्धिबळावर व विशेषतः सध्याच्या खेळ पद्धतीवरच नाराज आहे. कारण मला हिशेबी व अचूकतेच्या पलीकडील बुद्धिबळाची अपेक्षा आहे."

कॉम्प्युटरच्या जमान्यात जन्माला आलेली बुद्धिबळपटूंची पिढी शक्तिशाली 'चेस इंजिन' च्या विश्लेषणावर मोठी होते आहे. परंतु तुम्ही सुरक्षिततेच्या दृष्टीने अप्रशस्त असले तरी, पटावर समतोल राखून फसवे डावपेच बेधडक खेळून प्रतिस्पर्ध्याला धूळ चारू शकता. अन्यथा बुद्धिबळ कृष्णविवरा सारखे पराकोटीचे मर्यादित अथवा छोटे होईल असे मला वाटते. खडतर अभ्यासा आधारे तंतोतंत अथवा अचूक खेळणे हा मोठा गुण आहे, यामध्ये कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. मात्र केवळ यांत्रिक विश्लेषणावर आधारित गृहपाठाचे सादरीकरण बुद्धिबळ पटावर होऊ नये, एवढीच माफक अपेक्षा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com