महाराष्ट्र केसरी 2020 : पंढरपूरच्या अटकळे बंधूंचा सुवर्णवेध!

Atakale-Brothers
Atakale-Brothers

महाराष्ट्र केसरी 2020 : पुणे : प्रतिकूल परिस्थितीतून कुस्तीतला प्रवास करत सख्ख्या भावांनी महाराष्ट्र केसरीचे मैदान शनिवारी (ता.4) गाजवले. संघर्षातून यश कसे मिळवावे याचा दाखला त्यांनी देऊन पंढरपूर तालुक्‍यातील शेगाव दुमाला या आपल्या गावाचे नाव ठळक केले. या दोघा भावंडांची नावे म्हणजे आबासाहेब अटकळे व जोतिबा अटकळे. 

57 किलो वजनी गटात माती विभागात आबासाहेबने तर गादी विभागात जोतिबाने प्रेक्षणीय लढती करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. 

वडिलांचं स्वप्न म्हणून झाले पहिलवान 

घरची परिस्थिती बेताची, शेतात पिकलं तरच खायला. पण आपल्या दोन मुलांना पहिलवान करायचंच म्हणून बजरंग अटकळे इर्षेला पेटले. आपण गाजलेला पहिलवान होऊ शकलो नाही म्हणून आपली इच्छा आपली मुलं पूर्ण करतील असा निश्‍चय करत त्यांना वयाच्या दहाव्या वर्षीच लंगोट बांधला आणि त्यांच्या अंगाला तांबडी माती लावली.

गावाशेजारच्या यात्रा-जत्रा, उरसात होणाऱ्या कुस्तीच्या फडात ते आबा व जोतिबाला घेऊन जात. या दोघांच्या सोबत चुलत भाऊ भिकाजीही असायचा, तो चांगल्या कुस्त्या मारायचा, लोकं त्याची वाहवा करायची. हे सर्व पाहून आपणही मोठ्ठं पहिलवान व्हावं अशी इच्छा निर्माण झाल्याचे ते दोघे सांगतात. 

हळूहळू या दोन भावंडांची जोडी चटकदार कुस्त्या करत चमकवू लागली. हीच चमक हेरत वस्ताद मारुती माळी यांनी वाडी कुरोली गावाच्या आखाड्यात या दोन मल्लांवर पैलू पाडले. शालेय कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय पातळी गाठल्यानंतर त्यांनी पुढील तंत्रशुद्ध प्रशिक्षणासाठी पुण्याचे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल गाठले. वस्ताद काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दहा वर्षे ते सराव करत आहेत. 

कुस्तीतील स्पेशालिटी 

आक्रमक पवित्रा घेऊन धडाकेबाज कुस्ती लढणे ही या दोघांची खासियत आहे. भारंदाज या डावावर पकड असणाऱ्या आबासाहेबाने राष्ट्रीय स्पर्धेत सहा तर राज्य स्पर्धेत पाच वेळा पदकांची कमाई केली आहे. ढाक डाव मारणे तसेच दुहेरी पट काढून प्रतिस्पर्धी मल्लावर कब्जा घेणे या गुणवैशिष्ट्यांवर जोतिबाने सात वेळा राष्ट्रीय तर पाच वेळा राज्य अजिक्‍यपद स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे. 

ऑलिंपिकचे ध्येय बाळगून आमचा प्रवास सुरू आहे. वस्तादांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांची साथ या जोरावर आम्ही दोघे भाऊ नेहमीच जिंकत आलोय अन्‌ पुढेही कष्ट करत राहू. 
- आबासाहेब आणि जोतिबा अटकाळे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com