ऍडव्हॉन्टेज ब्राझील, नाहीतर धक्कादायक निकाल... 

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

सलामी कधीच सोपी नसते 
विश्‍वकरंडक स्पर्धेचा पहिला सामना कधीच सोपा नसतो; पण ऍडव्हॉन्टेज ब्राझीलकडे असेल, असे मला वाटते. अन्यथा, धक्कादायक निकालही लागू शकतो. 

दोन वर्षांपूर्वी ब्राझीलच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे टिटे यांनी घेतल्यानंतर या संघाने कमालीची प्रगती केली आहे. 21 पैकी 17 सामने जिंकले आहेत. अवघ्या एका सामन्यात पराभव झाला आहे. 47 गोल करताना केवळ पाच गोल स्वीकारले. ही आकडेवारी थक्क करणारी आहे. 2014 मध्ये युरोपियन संघाविरुद्ध त्यांचा बचाव उघडा पडला होता. याचीसुद्धा आठवण ठेवायला हवी. त्यानंतर टिटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नुकतेच रशिया, जर्मनी आणि क्रोएशियाविरुद्ध विजय मिळवलेले आहेत. जर्मनीने ताकदीचा संघ उतरवला नसला, तरी ब्राझीलचा खेळ ताकदवर होता. केवळ नेमारच नाही. त्यांच्याकडे इतर खेळाडूही तेवढ्याच क्षमतेचे आहेत. 

मोठ्या स्पर्धांमध्ये युरोपियन संघांचे चक्रव्यूह भेदणे सोपे नसते, हे मी अनुभवावरून सांगू शकतो. त्या सर्व संघाकडे तंत्र, मंत्र आणि क्षमता एकाच क्षमतेची असते, असे नाही; परंतु त्यांचा योजनाबद्ध खेळ भारी ठरत असतो. सावध खेळ करण्याची त्या सर्वांकडे क्षमता आहे आणि स्वीत्झर्लंड हे उत्तम उदाहरण आहे. मोठी स्पर्धा जवळ येताच त्यांचे मानांकन उंचावत असते. प्रशिक्षक व्लादिमीर पेटतोविच 4-2-3-1 अशा रचनेत खेळ करतात. यावरून ते बचावाला किती महत्त्व देतात, हे सिद्ध होते. 

असे असले तरी स्वीत्झर्लंडसमोर उद्या मोठे आव्हान असेल. ब्राझील 4-3-3 अशा रचनेतच खेळ करेल. नेमार आणि कुटिन्हो दोन्ही बाजूने आक्रमणे करतील. तर, जिजस आणि फिर्मिनो गोलक्षेत्रात सज्ज असतील. त्यांचा प्रत्येक जण जबरदस्त आक्रमणाची क्षमता बाळगून आहे. त्यामुळे त्यांना 90 मिनिटे थोपवून ठेवणे कठीण आहे. 

दुखापतीनंतर परतणारा नेमार अधिक चपळ झाला आहे. देशवासीयांच्या अपेक्षांचे ओझे त्याने स्वीकारले आहे. प्रतिस्पर्धींनी उसकवल्यानंतर तो संयम गमावतो. त्यामुळे त्याने संयम राखणे आवश्‍यक आहे. टिटे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राझीलचा बचावात सुधारणा झाली आहे. कमजोरपणा काय आहे, हे ते लगेच जाणतात. त्यामुळे उपचार करणे त्यांना सोपे जाते. ताज्या आकडेवारीनुसार ब्राझीलचा गोल स्वीकारण्यात आलेली घट हे सिद्ध करते. 

ब्राझीलच्या बचावातील प्रगतीची स्वीत्झर्लंडला जाणीव असेलच. त्यांचीही कामगिरी लक्षवेधक आहे. गेल्या 17 पैकी एकाच सामन्यात त्यांचा पराभव झालेला आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ब्राझीलविरुद्ध खेळायचे आहे, याचे ते दडपण घेणार नाहीत. आपल्या लौकिकानुसार खेळ करून ते ब्राझीलची कोंडी करण्याचा प्रयत्न करतील. असा संघ प्रामुख्याने काउंटर ऍटॅक करण्यात वाक्‌बगार असतो. ब्राझीलविरुद्ध ते अशीच रणनीती आखतील, असे वाटते. 

सलामी कधीच सोपी नसते 
विश्‍वकरंडक स्पर्धेचा पहिला सामना कधीच सोपा नसतो; पण ऍडव्हॉन्टेज ब्राझीलकडे असेल, असे मला वाटते. अन्यथा, धक्कादायक निकालही लागू शकतो. 

Web Title: Advantage Brazil, otherwise get shocking results