World Cup 2019 : अफगाणिस्तान संघाला अखेरची संधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जुलै 2019

आंतरराष्ट्रीय स्तरावरील अननुभवच या स्पर्धेत त्यांच्या यशाच्या आड आला. प्रथम भारत आणि नंतर पाकिस्तान या आशियाई देशांना त्यांनी दिलेली झुंज नक्कीच या स्पर्धेच्या आठवणीत राहील.

वर्ल्ड कप 2019 : हेडिंग्ले : समाधानकारक कामगिरीनंतरही यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत गुणांचे खाते उघडण्यास अपयशी ठरलेल्या अफगाणिस्तान संघाला आज (गुरुवार) अखेरची संधी असेल. दोन्ही संघांचा स्पर्धेतील अखेरचा सामना असल्यामुळे मायदेशी परतण्यापूर्वी जाता जाता यश मिळविण्यासाठी दोघेही उत्सुक असतील यात शंका नाही. 
अफगाणिस्तान संघाने यंदाच्या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. विजय त्यांच्या हाती लागला नसला, तरी त्यांना कुणी नावे ठेवणार नाही.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील अननुभवच या स्पर्धेत त्यांच्या यशाच्या आड आला. प्रथम भारत आणि नंतर पाकिस्तान या आशियाई देशांना त्यांनी दिलेली झुंज नक्कीच या स्पर्धेच्या आठवणीत राहील. अफगाणिस्तान संघ जिंकणार असे वाटत असतानाच त्यांनी प्रत्येकवेळेस आपल्या हातातील संधी गमावली. त्यांच्या फिरकी गोलंदाजांनी सातत्याने चांगली कामगिरी केली. मात्र, वेगवान गोलंदाज आणि फलंदाज प्रभाव पाडू शकले नाहीत. सलामीचा फलंदाज महंमद शहजाद याला दुखापतीमुळे स्पर्धा अर्ध्यावरतीच सोडावी लागली याचा त्यांना चांगलाच फटका बसला. 

विश्‍वकरंडक स्पर्धेत दोन्ही संघ प्रथमच समोरासमोर येत असले, तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये झालेल्या चार सामन्यांत अफगाणिस्तानने तीन विजय मिळविले आहेत. विश्‍वकरंडक पात्रता फेरीतही विंडीजवर मिळविलेला विजय त्यांच्या विश्‍वकरंडक प्रवेशासाठी निर्णायक ठरला होता. 
वेस्ट इंडीजची कथा या पेक्षा वेगळी काही नाही. त्यांनी तर या स्पर्धेत विजयाने सुरवात केली होती. पाकिस्तानविरुद्ध विजय मिळविताना त्यांनी जो खेळ दाखवला, तो त्यांना परत दाखवता आला नाही. ख्रिस गेल, शाय होप, शिमरन हेटमेर, निकोलस पूरन हे फलंदाज आपल्या गुणवत्तेला न्याय देऊ शकले नाही.

पूरन याने श्रीलंकेविरुद्ध दाखवलेली जिगर वगळता विंडीजच्या हाती पहिल्या विजयानंतर काहीच लागले नाही. गोलंदाजीत वेगाच्या नादात दिशा आणि टप्पा विसरण्याचा त्यांना फटका बसला. त्यावर नियंत्रण मिळवायला गेलं तर त्यांची गोलंदाजीतील लय बिघडली. शेल्डन कॉट्रेल वगळता त्यांचे अन्य गोलंदाज म्हणावा तेवढा प्रभाव पाडू शकले नाहीत. 

साहजिकच, आता अखेरचा सामना जिंकून विजयी आकड्यात भर घालण्याची विंडीजला, तर विजयासह गुणांचे खाते उघडण्याची अफगाणिस्तानला या स्पर्धेतील अखेरची संधी असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Afghanistan vs West Indies match preview in World Cup 2019