esakal | विराटच्या वर्तनावरून संघात दुफळी?
sakal

बोलून बातमी शोधा

विराटच्या वर्तनावरून संघात दुफळी?

विराटच्या वर्तनावरून संघात दुफळी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कसोटी अजिंक्यपदाचा सामना भारतीय क्रिकेट संघामध्ये दुफळीची बीजे रोवणारा होता, असे संकेत देणारे वृत्त आता प्रसिद्ध होत आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदावरून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी थेट बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याकडे तक्रार केल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा: Video : फिल्डरला कमकूवत समजून विराट फसला!

न्यूझीलंडविरुद्धच्या त्या सामन्यात पुजारा आणि रहाणे अपयशी ठरले होते. प्रामुख्याने पुजाराच्या संथ फलंदाजीवर जोरदारा टीका करण्यात आली होती. त्याने पहिल्या डावात ८ धावा केल्या आणि त्यासाठी ५४ चेंडूंचा सामना केला होता, तर दुसऱ्या डावात ८० चेंडूत केवळ १५ धावा केल्या; तर रहाणेने पहिल्या डावात ४९ (११७ चेंडू) आणि १५ (४०) एवढ्याच धावा केल्या होत्या.

धावा करण्याची मानसिकता प्रबळ असायला हवी आणि धावा करण्यासाठी मार्ग काढणे आवश्यक होते, अशी तिरकस टीका विराट कोहलीने पराभवानंतर केली होती. बाद होण्याची चिंता करत बसता आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना वर्चस्व गाजवण्याची संधी मिळते, असे सांगताना विराटचा रोख पुजारा आणि रहाणेवर होता. कोहलीच्या या टीकेनंतर पुजारा आणि रहाणे यांनी कोहलीच्या या वर्तनावरून जय शहा यांच्याशी दूरध्वनीवरून नाराजी व्यक्त केली. भारतीय ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येऊ लागले. त्यानंतर ड्रेसिंगरूमधील आणि विराटच्या एकूणच वर्तनावरून बीसीसीआयने इतर खेळाडूंकडून मत आजमावण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आज प्रसिद्ध झाले आहे.

हेही वाचा: IPL 2021 : मॅक्सवेलची फिफ्टी, RCB प्ले ऑफपासून एक पाउल दूर

या सर्व घटनाक्रमानंतर विराटवर बीसीसीआयने दडपण टाकण्यास सुरुवात केली आणि त्याचाच भाग म्हणून त्याने येत्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर ट्वेन्टी-२० प्रकारातील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. केवळ रहाणे आणि पुजाराच नव्हे तर विराटच्या एकूणच वर्तनावर अनुभवी गोलंदाज आर. अश्विननेही बीसीसीआयकडे तक्रार केल्याची बातमी एका वृत्तसंस्थेने काही दिवसांपूर्वीच दिली होती. कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात अश्विन खेळला होता, परंतु त्यानंतर झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या चारही कसोटी सामन्यांसाठी अंतिम संघात अश्विनला एकदाही संधी देण्यात आली नाही. चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टी फिरकीस साथ देण्याची शक्यता असल्याने प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अश्विनला संधी देण्यास प्राधान्य दिले होते, परंतु शास्त्री यांची ही सूचनाही कोहलीने झिडकारली असल्याचेही वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हणण्यात आले होते.

loading image
go to top