
CWG 2022 : पदार्पण करणाऱ्या अंशू मलिकने कुस्तीत जिंकले रौप्य पदक
Commonwealth Games 2022 : महिला फ्रीस्टाईल कुस्तीच्या (Wrestling) 57 किलो वजनी गटात भारताची कुस्तीपटू अंशू मलिकचा (Anshu Malik) नायजेरियाच्या ओडूनायोने पराभव करत सुवर्ण पदक (Silver Medal) पटकावले. अंशू मलिकला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे अंशू मलिकचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील पदार्पण आहे. अंशूने आपले सलग दोन सामने तांत्रिक सरसतेच्या जोरावर जिंकत फायनल गाठली होती.
पहिल्या सत्रात नायजेरियाच्या ओडूनायोने दोन दोन असे एकूण चार तांत्रिक गुण पटकावले. पहिल्याच सत्रात पिछाडीवर पडलेल्या अंशूने दुसऱ्या सत्रात मात्र मुसंडी मारत पहिल्यांदा 1 त्यानंतर 2 असे एकूण तीन तांत्रिक गुण पटकावले. मात्र नायजेरियाच्या ओडूनायोने याच सत्रात 3 गुण घेत सामना 7 - 3 असा जिंकला.
भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदकावर नाव कोरले. त्याने कॅनडाच्या 21 वर्षाच्या लॅचलीन मक्नेलचा पराभव केला. बजरंगने मक्नेलचा 9 - 2 असा पराभव केला. बजरंगचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील सलग तिसरे गोल्ड मेडल आहे. त्याने 2018 मध्ये झालेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत देखील 65 किलो वजनी गटात सुवर्ण कमाई केली होती. तर 2014 ला ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत 61 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली होती. बजरंगच्या सुवर्ण पदकामुळे भारताचे पदक तालिकेत आता 7 सुवर्ण झाले आहेत.