
Commonwealth Games 2022 : साक्षी मलिकने (Sakshi Malik) बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकत राष्ट्रकुल पदकांची हॅट्ट्रिक साजरी केली. तिने कॅनडाच्या अॅना गोडिनेझ गोंझालेझचा पराभव केला. पहिल्या डावात साक्षी 4 - 0 ने पिछाडीवर होती. मात्र दुसऱ्या डावात साक्षीने पिन डाऊन डाव टाकत साक्षी मलिकने थेट सुवर्ण पदकालाच गवसणी घातली. सामना 4 - 4 बरोबर होता मात्र साक्षीने पिन डाऊन हा मोठा डाव खेळला.
साक्षी मलिकने अॅनाविरूद्ध पहिल्यांदा आक्रमक डाव खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसला आणि अॅनाने दोन गुण मिळवले. अॅनाने टेक डाऊन डाव खेळत पुन्हा एकदा दोन गुणांची कमाई केली. त्यामुळे पहिल्या सत्रात अॅना गोंझालेझने साक्षी मलिकवर 4 गुणांची आघाडी मिळवली.
दुसऱ्या सत्रात मलिकने टेक डाऊनचे दोन गुण मिळवले. त्यानंतर तिने पिन फॉल डाव टाकत थेट सुवर्ण पदक पटकावले.
भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदकावर नाव कोरले. त्याने कॅनडाच्या 21 वर्षाच्या लॅचलीन मक्नेलचा पराभव केला. बजरंगने मक्नेलचा 9 - 2 असा पराभव केला. बजरंगचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील सलग तिसरे गोल्ड मेडल आहे. त्याने 2018 मध्ये झालेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत देखील 65 किलो वजनी गटात सुवर्ण कमाई केली होती. तर 2014 ला ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत 61 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली होती.
हिला फ्रीस्टाईल कुस्तीच्या 57 किलो वजनी गटात भारताची कुस्तीपटू अंशू मलिकचा नायजेरियाच्या ओडूनायोने पराभव करत सुवर्ण पदक पटकावले. अंशू मलिकला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे अंशू मलिकचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील पदार्पण आहे. अंशूने आपले सलग दोन सामने तांत्रिक सरसतेच्या जोरावर जिंकत फायनल गाठली होती.