अर्जेंटिना-इस्राईल लढत रद्द 

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याला आलेल्या गंभीर धमकीचे कारण देत अर्जेंटिनाने इस्राईलमधील विश्‍वकरंडकाची पूर्वतयारी लढत बुधवारी रद्द केली. ही लढत न खेळण्यासाठी पॅलेस्टाईन मेस्सी; तसेच अर्जेंटिनावर दडपण आणत होते. 

जेरुसलेम - अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याला आलेल्या गंभीर धमकीचे कारण देत अर्जेंटिनाने इस्राईलमधील विश्‍वकरंडकाची पूर्वतयारी लढत बुधवारी रद्द केली. ही लढत न खेळण्यासाठी पॅलेस्टाईन मेस्सी; तसेच अर्जेंटिनावर दडपण आणत होते. 

अर्जेंटिना आणि इस्राईल यांच्यातील लढत शनिवारी होणार होती. या लढतीची सर्व तिकिटे विकली गेली होती. पॅलेस्टाईनने या लढतीच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते. एवढेच नव्हे; तर मेस्सी या लढतीत खेळल्यास त्याचे नाव असलेला शर्ट, फोटो जाळण्याचे आवाहन केले होते. त्यामुळेच लढत संकटात आली होती. आता इस्राईल राजदूतावासाने ही लढत रद्द केल्याचे सांगताना मेस्सीला असलेल्या धमकीचे कारण सूचित केले आहे. अर्थात इस्राईलमधील प्रसारमाध्यमांनी ही लढत होणार नसल्याच्या बातम्या काही दिवसांपासून दिल्या होत्या. 

लढत रद्द झाल्याची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच अर्जेंटिनाचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज फॉरी यांनी देशाचे खेळाडू इस्राईलमध्ये खेळण्यास तयार नसल्याचे सांगितले होते, तर गेल्या आठवड्यात अर्जेंटिनाचे मार्गदर्शक जॉर्ज सॅम्पोली यांनी अर्जेंटिना - इस्राईल लढत बार्सिलोनात आयोजित करण्याची सूचना केली होती. सध्या संघाचा सराव बार्सिलोनात सुरू आहे. 

जेरुसलेम हा आपला भाग असल्याचा पॅलेस्टाईनचा दावा आहे. त्याच शहरात इस्राईलने लढत घेतल्यामुळे तणाव वाढल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीस ही लढत हैफा येथे होणार होती; पण इस्राईल सरकारने लढतीचे ठिकाण काही दिवसांपूर्वी बदलले होते. अमेरिकेने जेरुसलेम ही इस्राईलची राजधानी असल्याचे काही महिन्यांपूर्वी मान्य केले; तसेच आपला दूतावासही सुरू केला. त्यानंतर इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील तणाव वाढला आहे. आता या लढतीचा उपयोग करून पॅलेस्टाईनने जेरुसलेमचा प्रश्न तापवत असल्याचा आरोप इस्राईलने केला. 

इस्राईल पंतप्रधानांचे लढतीसाठी प्रयत्न 
अर्जेंटिना आणि इस्राईल यांच्यातील लढत पूर्वनिश्‍चित कार्यक्रमानुसार होण्यासाठी इस्राईलचे पंतप्रधान प्रयत्नशील असल्याचे समजते. ते यासंदर्भात अर्जेंटिनाचे अध्यक्ष मॉरिसिओ मॅक्री यांच्याबरोबर चर्चा करणार असल्याचे समजते. मात्र, या वाटाघाटी यशस्वी होण्याची शक्‍यता धूसर असल्याचे संकेत इस्राईलमधील अधिकारी देत आहेत. 

पॅलेस्टाईनमध्ये जल्लोष 
अर्जेंटिनाने लढत रद्द केल्याची बातमी आल्यावर पॅलेस्टाईनमध्ये जल्लोष झाला. पॅलेस्टाईन फुटबॉल संघटनेने याबद्दल मेस्सीचे आभार मानले आहेत. खेळापासून राजकारण दूर ठेवण्याच्या भूमिकेचा विजय झाला असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. अखेर योग्य निर्णय घेण्यात आला, अशी टिप्पणी अर्जेंटिना संघातील आक्रमक पॉल हिगुएन याने केली. 

Web Title: Argentina-Israel match canceled