esakal | दिग्गजांनाही माहीची भुरळ

बोलून बातमी शोधा

Article On Mahendra Singh Dhoni

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ म्हणतो, ‘‘जर मला माझा फेव्हरिट संघ निवडायचा असेल तर त्याचे नेतृत्व धोनीकडेच देईन.’’

दिग्गजांनाही माहीची भुरळ
sakal_logo
By
युवराज इंगवले

महेंद्रसिंग धोनी आणि भारतीय क्रिकेटचे नाते अतूट आहे. त्याने भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्याच्या उल्लेखाशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही. धोनीने २३ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची यशस्वी १५ वर्षे पूर्ण केली आहेत. कॅप्टन कूल म्हणून बिरुदावली मिरवणाऱ्या धोनीने २३ डिसेंबर २००४ मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. टीम इंडियाला विश्‍वकरंडक आणि टी-२० विश्‍वकरंडक जिंकून देणाऱ्या धोनीच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये सामान्य भारतीय, राजकारणी, चित्रपट कलाकारांचा समावेश तर आहेच; पण दिग्गज क्रिकेटपटूही त्याच्या प्रेमात आहेत.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ म्हणतो, ‘‘जर मला माझा फेव्हरिट संघ निवडायचा असेल तर त्याचे नेतृत्व धोनीकडेच देईन.’’ धोनीच्या नेतृत्वाबाबत प्रश्‍नच नसल्याचे भारताचा कर्णधार विराट कोहली याने म्हटले आहे. क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तीन वर्षांत धोनी भारतीय संघाचा कर्णधार झाला. त्याच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय, टी-२० विश्‍वकरंडक तसेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. आयसीसीच्या तीन महत्त्वाच्या स्पर्धा जिंकलेला धोनी विश्‍वकरंडकात न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या उपांत्य सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. सध्या धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा रंगली आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली हे त्याच्या मताचा आदर करतील. ‘‘धोनीचा योग्य तो सन्मान केला जाईल,’’ असे गांगुली यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सांगितले होते. त्यामुळे धोनीची निवृत्ती सन्माननीयच असेल, हे नक्की.

धोनीबाबत दिग्गज म्हणतात...

  • मरण्यापूर्वी २०११ विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील माहीने तडकावलेला विजयी षटकार बघेन. ः सुनील गावसकर
  •  माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कर्णधार महेंद्रसिंग धोनीच असेल. ः सचिन तेंडुलकर
  •  महान नेतृत्वाचे धोनी उत्तम उदाहरण आहे. ः राहुल द्रविड 
  •  धोनी तर माझा हिरोच आहे. सचिन आणि वीरेंद्र सेहवाग यांच्याएवढीच धोनीमध्ये गुणवत्ता आहे. ः कपिलदेव 
  •  दिग्गज खेळाडूंची जर तुलना करावयाची झाल्यास सुनील गावसकर, कपिलदेव, सचिन तेंडुलकर आणि धोनी एकाच पंक्तीत बसतात. ः रवी शास्त्री
  •  धोनीचा खेळ पाहण्यासाठी मी तिकीट काढून स्टेडियममध्ये जाईन आणि महान खेळाडूचा खेळ पाहण्याचा आनंद घेईन. ः ॲडम गिलख्रिस्ट
  •  धोनी जर माझ्याबरोबर असेल तर आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकतो. ः गॅरी कर्स्टन 
  •  जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात १५ धावांची गरज असेल तर दबाव धोनीवर नसेल, तर तो गोलंदाजावरच असेल. ः इयान बिशप