Asian Games 2018 : कबड्डीत भारताची जोरदार चढाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

जाकार्ता (इंडोनेशिया) - भारतीय कबड्डी संघांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवशी जोरदार चढाई केली. पुरुषांनी सलग दोन, तर महिलांनी एक विजय मिळवला. 

जाकार्ता (इंडोनेशिया) - भारतीय कबड्डी संघांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवशी जोरदार चढाई केली. पुरुषांनी सलग दोन, तर महिलांनी एक विजय मिळवला. 

भारतीयांच्या खेळात सफाई निश्‍चित होती. पण, कधी थेट समोर न आलेल्या श्रीलंकेविरुद्ध खेळताना भारतीयांच्या नियोजनाचा कस लागला. सुरवातीची आघाडी महत्त्वपूर्ण असतानाच भारत येथे श्रीलंकेविरुद्ध ३-७ असे मागे पडले होते. त्या वेळी अजय ठाकूर आणि मनू गोयतच्या चढाया निर्णायक ठरल्या. त्याचवेळी गिरीश इरनाक आणि मोहित चिल्लर यांची कोपरारक्षकाची कामगिरी जोरदार झाली. लय सापडल्यावर त्यांनी श्रीलंकेला दडपणाखाली टाकत विश्रांतीला दोन लोण देत २७-१३ अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धात श्रीलंकेच्या खेळाडूंनी सुपर टॅकलचा सपाटा लावत भारतीयांना इशारा दिला.

दोनदा अजय ठाकूर, तर एकदा मनू गोयत यात सापडले. मात्र, मोठी आघाडी भारताच्या पथ्यावर पडली. सुपर टॅकलच्या फेऱ्यातून बाहेर पडत भारताने अखेर श्रीलंकेवर तिसरा लोण देत आपली बाजू भक्कम केली. भारताच्या चढाईपटूंनी दाखवलेला वेग आणि कौशल्य हाच या सामन्यातला फरक ठरला; अन्यथा श्रीलंकेच्या बचावपटूंकडून भारताला चांगले आव्हान मिळत होते. अजय ठाकूर, मनू गोयत, राहुल चौधरी, प्रदीप नरवाल, रिशांक देवाडिगा असे चढाईतील सगळे पर्याय भारतीय संघाने वापरले. भारताने हा सामना ४४-२८ असा जिंकून आपले वर्चस्व अधिक भक्कम केले. 

त्यापूर्वी, पहिल्या सामन्यात भारतीय पुरुषांनी बांगलादेशाचे आव्हान ५०-२१ असे सहज परतवून लावले. महिला संघाने जपानचा ४३-१२ असा पराभव केला.

Web Title: Asian Games 2018 Women Kabaddi Competition