World Cup 2019 : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी 

वृत्तसंस्था
रविवार, 2 जून 2019

अफगाणिस्तनला 207 धावांत रोखल्यानंतर कांगारूंनी 35व्या षटकात विजय साकार केला. बिनीचा डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने 89 धावांची नाबाद खेळी केली. कर्णधार फिंच याच्यासह त्याने 96 धावांची सलामी दिली. यात फिंचचा वाटा 66 धावांचा होता.

ब्रिस्टल : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला सात विकेट राखून हरवित विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. 

अफगाणिस्तनला 207 धावांत रोखल्यानंतर कांगारूंनी 35व्या षटकात विजय साकार केला. बिनीचा डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने 89 धावांची नाबाद खेळी केली. कर्णधार फिंच याच्यासह त्याने 96 धावांची सलामी दिली. यात फिंचचा वाटा 66 धावांचा होता. त्यानंतर वॉर्नरने ख्वाजाच्या साथीत 66 धावा जोडल्या, ज्यात ख्वाजाचा वाटा केवळ 15 धावांचा होता. अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजीला कांगारूंनी दाद लागू दिली नाही, जे उल्लेखनीय ठरले. 

तत्पूर्वी, अफगाणिस्तानने 38.2 षटके तग धरत 207 धावा केल्या. गोलंदाजांनी फलंदाजांना बाद केले म्हणण्यापेक्षा अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी सतत मोठे फटके मारायच्या प्रयत्नात बळी गमावले. झाद्रानने अर्धशतक केल्याने दोनशे धावांचा टप्पा पार करता आला. ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने धावा खूप दिल्या. पण, तीन फलंदाजांना बादही केले. 

गुलबदीन नईबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानची सुरवात फारच खराब झाली. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर स्टार्कने अहमद शहजादच्या स्टंप हलविल्या. पाठोपाठ हझरातुल्ला झाझाई शून्यावर बाद झाला. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज फलंदाजांना नामोहरम करणार वाटत असताना रहमत शहाने डाव सावरला. त्याच्या फलंदाजीत नजाकत दिसली. 

जम बसला वाटत असताना फलंदाज बाद होण्याचा क्रम नंतर चालू राहिला; ज्याने डावाला आकार आलाच नाही. रहमत शहा आणि हश्‍मातुल्लाह शाहिदीने झम्पाला विकेट बहाल केल्या. त्यातून नबी धावबाद झाला. मधल्या फळीत नईबने नजिबुल्ला झाद्रानला सुरेख साथ दिली. झाद्रानने झम्पाला लक्ष बनवीत एकाच षटकात दोन चौकार व दोन षटकारांची बरसात केली. झाद्रानने अर्धशतक झळकाविल्यावर शेवटपर्यंत खेळपट्टीवर उभे राहण्याचा प्रयत्न करायला हवा होता. 

झाद्रान आणि नईबने पाठोपाठ विकेट दिल्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केले. अष्टपैलू स्टॉयनीसने हळू वेगाचा आखूड टप्प्याचा चेंडू टाकून स्थिरावलेल्या फलंदाजांना चुका करायला भाग पाडले. टी-20 क्रिकेटचा हिरो रशीद खानने तीन षटकार ठोकत झटपट 27 धावा केल्या. झम्पाला आडवा फटका मारताना रशीद बाद झाल्यावर डाव संपायला वेळ लागला नाही. स्टीव्ह स्मिथने गोलंदाजांना आणि कर्णधार फिंचला मोलाचे सल्ले दिले. 

संक्षिप्त धावफलक : 
अफगाणिस्तान ः 38.2 षटकांत सर्वबाद 207 (रहमत शाह 43, गुलबदीन नईब 31, नजीबउल्लाह झाद्रान 51- 66 चेंडू, 7 चौकार, 2 षटकार, रशीद खान 27- 11 चेंडू, 2 चौकार, 3 षटकार, मिचेल स्टार्क 1-31, पॅट कमिन्स 3-40, मार्कस स्टॉयनीस 2-37, ऍडम झम्पा 3-60) पराभूत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ः 34.5 षटकांत 3 बाद 209 (ऍरॉन फिंच 66- 49 चेंडू, 6 चौकार, 4 षटकार, डेव्हिड वॉर्नर नाबाद 89- 114 चेंडू, 8 चौकार, स्टीव स्मिथ 18, मुजीब उर रेहमान 1-45, नईब 1-32, नबी 6-0-32-0, रशीद खान 8-0-52-1)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia beats Afghanistan by 8 wickets in World Cup 2019