
सहकारी महिलेला अश्लील मेसेज, फोटो पाठवल्याबद्दल चौकशी सुरु असल्याची चर्चा
Ashes मालिकेआधी टीम पेनचा कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा
ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन याने आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. पेनने इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या प्रतिष्ठेच्या Ashes मालिकेआधी हा मोठा निर्णय घेतला. एका महिला सहकाऱ्याला आक्षेपार्ह मेसेज केल्याप्रकरणी त्याच्यावर चौकशी सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे त्याने पदाचा राजीनामा दिला.
होबार्टमध्ये त्याने ही घोषणा केली. २०१८ मध्ये चेंडू कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरून दूर करण्यात आले होते. त्या जागी कर्णधार म्हणून टीम पेनला जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण एका सहकारी महिलेला अश्लील टेक्स्ट मेसेज आणि फोटो पाठवल्याबद्दल पेनची चौकशी सुरु असल्याचं काही रिपोर्टमध्ये म्हटलं. त्यानंतर त्याने राजीनामा दिला.
"माझ्या निर्णयाच्या पार्श्वभूमीमागे चार वर्षांंपूर्वीचे एक प्रकरण आहे. मी त्यावेळच्या एका महिला सहकाऱ्याला टेक्स्ट मेसेज केले होते. त्याबद्दल माझी चौकशी सुरु होती. यात मी पूर्णपणे सहकार्य केलं. चौकशीमध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आचारसंहितेचं उल्लंघन झालं नसल्याचं आढळलं. त्या प्रकरणात माझी निर्दोष मुक्तता झाली होती. पण तरीही यामुळे माझ्या मनात या प्रकरणाची सल होती. मी त्यावेळी पत्नी आणि कुटुंबियांशी चर्चा केली. मला माफ केल्याबद्दल आणि पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा ऋणी आहे. माझ्या या कृतीने जर क्रिकेट या खेळाच्या प्रतिमेला धक्का लागला असेल तर त्यासाठी मी साऱ्या चाहत्यावर्गाची माफी मागतो", असं टीम पेन याने आपला पदभार सोडताना सांगितलं.