मॅक्सवेलच्या वादळात भारतीय गोलंदाज भुईसपाट; मालिका गमाविली

वृत्तसंस्था
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

बंगळूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात ग्लेन मॅक्‍सवेलने शानदार शतक झळकावत भारताचा विजय हिसकावून घेतला. त्याच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतावर सात गडी राखून विजय मिळवला आणि मालिकाही दोन शून्य अशी खिशात घातली.

बंगळूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात ग्लेन मॅक्‍सवेलने शानदार शतक झळकावत भारताचा विजय हिसकावून घेतला. त्याच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतावर सात गडी राखून विजय मिळवला आणि मालिकाही दोन शून्य अशी खिशात घातली.

भारताने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलेल्या 191 धावांच्या  आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा  सलामीवीर मार्क सुस टॉनिक आणि कर्णधार ऍरोन फिंच लवकरच बाद झाले. त्यामुळे भारताच्या सामन्यात बाजी मारणार अशी आशा निर्माण झाली. मात्र मॅक्‍सवेलने या आशांवर पूर्ण पाणी फेरले. त्याने नाबाद 113 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने सर्वच भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. 

त्यापूर्वी, भारताचा कर्णधार विराट कोहलीचा झंझावात आणि त्याला महेंद्रसिंह धोनीकडून मिळालेली पूरक साथ याच्या जोरावर भारताने बुधवारी दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 191 धावांचे आव्हान ठेवले. 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकताना पुन्हा एकदा भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कर्णधाराचा पाठिंबा मिळालेल्या लोकेश राहुलने शिखर धवनच्या साथीत डावाला सुरवात केली. राहुलची टोलेबाजी आणि शिखर धवनचा संयम अशी ही जोडी भारताच्या डावाला आकार देत असतानाच ही जोडी पाठोपाठ बाद झाली. प्रथम कौल्टर नाईलने राहुलला बाद केले. त्याने 26 चेंडूंत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 47 धावांची खेळी केली. त्यानंतर शिखर धवनही बाद झाला. राहुलप्रमाणेच कर्णधाराचा पाठिंबा असलेला रिषभ पंत या सामन्यातही अपयशी ठरला. पंतला विनाकारण घाई करण्याची खोड महागात पडली. 

दमदार सुरवातीनंतर तीन विकेट झटपट पडल्यावर कोहली आणि धोनी या एकत्र आलेल्या जोडीने स्थिरावण्यासाठी थोडा वेळ घेतला. स्थिरावल्यावर मात्र त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही. एक वेळ संयम दाखवणाऱ्या कोहलीने आपल्यातील आक्रमकता दाखवून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना निराश केले. 
कोहलीचाच कित्ता समोरच्या बाजूने धोनीने गिरविल्यामुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाजी साफ निष्प्रभ ठरली. त्यांच्या झंझावाताने भारताच्या डावाने असा वेग घेतला की दोनशेची मजल आवाक्‍यात वाटत होती. अखेरच्या षटकांत धोनी बाद झाला. त्याने 23 चेंडूंत 40 धावांची खेळी करताना कोहलीच्या साथीत 56 चेडूंतच 100 धावांची भागीदारी केली. तीन चेंडू खेळण्याची संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकने दोन चौकार ठोकत भारताचे आव्हान भक्कम करण्यात वाटा उचलला. कोहलीने 38 चेंडूंत 2 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 72 धावांची खेळी केली. अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने भारताचे आव्हान भक्कम केले. पण, भारताला ही धावसंख्या विजय देवून मिळवू शकली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia won by 7 wickets