बॅडमिंटन संघ एकट्यावरच अवलंबून नाही - गोपीचंद

वृत्तसंस्था
बुधवार, 18 एप्रिल 2018

हैदराबाद - कित्येक वर्षे भारतीय बॅडमिंटनची मदार एखाद्‌ दोन खेळाडूंवर होती. आता चित्र बदलले आहे. अश्‍विनी पोनप्पा - सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांनी सांघिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सलामीची लढत जिंकल्याने श्रीकांत आणि साईना नेहवालवरील दडपण कमी झाले, असे प्रतिपादन भारताचे बॅडमिंटन मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांनी केले.

भारतीय बॅडमिंटनची ताकद वाढत असल्याचे सांगताना गोपीचंद यांनी राष्ट्रकुलच्या मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदकाची अपेक्षा आपण बाळगली नव्हती असे सांगितले. या यशाचे श्रेय अश्‍विनीला द्यायला हवे. तिने महिला आणि मिश्र दुहेरीतील सहकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले. सात्त्विक आणि चिरागने पदार्पणाच्या स्पर्धेत पदक जिंकत मला सुखद धक्का दिला, असेही गोपीचंद म्हणाले. 

सिंधू-साईना लढतीबाबत गोपीचंद म्हणाले, ‘‘दोघींमधील अंतिम लढत आपल्या सर्वांसाठीच स्पेशल होती. सिंधू-साईना लढतीचा दोघींनाही फायदा झाला. या प्रकारची स्पर्धा खेळाडूंना मदत करते.’’ 

जागतिक क्रमवारीत अव्वल आल्याचा अनुभव खासच असतो. तो अविस्मरणीयच आहे, पण माझ्यासाठी खेळातील सातत्य महत्त्वाचे आहे. 
- किदांबी श्रीकांत

मला कोणाविरुद्धही हरणे आवडत नाही, मग सिंधू असो किंवा अन्य कोणी. सिंधूचीही हीच भावना असेल. लढतीपूर्वी व्यूहरचना ठरवण्यापेक्षा सर्वोत्तम खेळावर भर देते.
- साईना नेहवाल

आमच्यात (सिंधू आणि साईनात) कोर्टवर स्पर्धा नक्कीच आहे, पण एकदा लढत संपल्यावर आम्ही आगामी स्पर्धेवर किंवा लढतीवर लक्ष केंद्रित करतो. 
- पी. व्ही. सिंधू

Web Title: Badminton team is not dependent on alone - Gopichand