माद्रिद : गेरार्थ बेलच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर रेयाल माद्रिदने ला लिगामध्ये सेल्टा व्हिगोचा 3-1 असा पाडाव केला आणि रेयाल माद्रिदचे मार्गदर्शक झिनेदीन झिदान यांना बेल या मोसमात रेयालकडेच राहील हे सांगणे भाग पडले.
झिदान यांनी रेयाल माद्रिदची सूत्रे हाती घेतल्यापासून बेलला निरोप मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. झिदान यांनी क्वचितच बेलला सुरुवातीपासून मैदानात उतरवले. बेलने या वेळी रेयालच्या पहिल्याच गोलमध्ये मोलाची कामगिरी बजावली. बेलचा वावर त्यानंतर लक्षणीय दिसत होता.
बेलबरोबर मी दोन-तीनदा चर्चा केली आहे. तो संघातच राहणार आहे. आमच्या संघात फारसा बदल होणार नाही, असे झिदान यांनी सांगितले. स्पॅनिश फुटबॉल लीगमधील खेळाडूंची खरेदी-विक्री 2 सप्टेंबरपर्यंत आहे.
मॅंचेस्टर सिटीवर वार
मॅंचेस्टर सिटीचा अखेरच्या मिनिटातील गोल वारने (व्हिडिओ असिस्टंट रेफरी) नाकारला आणि त्यांना टॉटनहॅमविरुद्ध 2-2 बरोबरी मान्य करावी लागली. अखेरच्या सेकंदात सिटीने गोल केला; पण या वेळी चेंडू हाताळल्याचा निर्णय वारने दिला. पूर्वार्धात आम्हाला पेनल्टी किक दिली नाही, त्यावेळी वारची मदत घेतली नाही, असा सिटीचा आक्षेप होता.
लिव्हरपूलने विजयी मालिका राखताना साऊदम्प्टनचा 2-1 असा पाडाव केला. याच फरकाने आर्सेनलने बर्नलीचा पराभव केला. सिटीला बरोबरी स्वीकारावी लागल्यामुळे लिव्हरपूलने अव्वल स्थान पटकावले आहे. नॉर्विचने पहिला विजय मिळवताना न्यूकॅसलला 3-1 असे पराजित केले.
|