बांगलादेश क्रिकेट अकादमीत विदर्भाचा वसीम जाफर प्रशिक्षक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 मे 2019

मुंबई : देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा शैलीदार फलंदाज वसीम जाफर याची बांगलादेश क्रिकेट मंडळाने आपल्या क्रिकेट अकादमीसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे.

मुंबई : देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा शैलीदार फलंदाज वसीम जाफर याची बांगलादेश क्रिकेट मंडळाने आपल्या क्रिकेट अकादमीसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे.

बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या वतीने हाय परफॉर्मन्स ऍकॅडमीची सुरवात ढाका येथे करण्यात आली आहे. येथे विविध वयोगटांतील बांगलादेशाच्या खेळाडूंना जाफर फलंदाजीचे धडे देईल. त्याचा कालावधी सहा महिन्यांचा असेल.
जाफर यंदाच्या देशांतर्गत मोसमातही विदर्भाकडूनच खेळणार आहे. ढाका प्रिमियर लीगमध्ये जाफर खेळला होता. त्या वेळी बांगलादेश मंडळाच्या खेळ प्रसार समितीचे अध्यक्ष असणाऱ्या खलिद महमूद सुजन यांनी जाफरला ऍकॅडमीत घेण्याचा प्रस्ताव मांडला. बांगलादेश क्रिकेट मंडळाने त्यास संमती दर्शविली. त्याच्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल, असे बांगलादेश क्रिकेट मंडळाने म्हटले आहे.

त्याच्या नियुक्तीबाबत सुजन म्हणाले, "जाफरच्या मार्गदर्शनाचा यापूर्वीच सौम्या सरकारला फायदा झाला आहे. जाफरच्या कामगिरीत कमालीचे सातत्य राहिले आहे. त्याचा अनुभवदेखील दांडगा आहे. भाषेचाही अडसर नसल्यामुळे खेळाडू त्याच्याशी सहज संवाद साधू शकतील.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangladesh appoint Wasim Jaffer as academy batting coach