esakal | BAN vs NZ : बांगलादेशच्या वाघांनी केली किवींची शिकार
sakal

बोलून बातमी शोधा

Bangladesh vs New Zealand

BAN vs NZ : बांगलादेशच्या वाघांनी केली किवींची शिकार

sakal_logo
By
सुशांत जाधव

बांगलादेशनं (Bangladesh) चौथ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंड (New Zealand) 6 विकेट्सने पराभूत करत मालिका खिशात घातली. पाच सामन्यांच्या मालिकेतील चार सामन्यांपैकी केवळ एकच सामना न्यूझीलंडने जिंकला होता. मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना अवघ्या 93 धावा केल्या. न्यूझीलंडने दिलेले लक्ष्य बांगलादेशनं 5 चेंडू आणि 6 गडी राखून पार केले.

न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात करणाऱ्या रचिन रविंद्रला या सामन्यातही आपल्यातील क्षमता दाखवून देण्यात अपयश आले. पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर तो खाते न उघडता तंबूत परतला. फिन एलन 12 धावांची भर घालून चालता झाला. टॉम लॅथम आणि विल यंग या जोडीनं मैदानात तग धरुन संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण या जोडीनं 35 धावांची भागीदारी झाली असताना लॅथमच्या रुपात न्यूझीलंडला तिसरा धक्का बसला. त्याने 21 धावा केल्या. विल यंगने 48 चेंडूंचा सामना करताना न्यूझीलंडकडून 46 धावांची सर्वोच्च खेळी केली. त्याच्यानंतर एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. बांगलादेशकडून नसुम अहमद आणि मुस्ताफिझुर रहमान यांनी प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या.

हेही वाचा: टीम इंडिया पुढच्या वर्षी जुलैमध्ये पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर

न्यूझीलंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर लिटन दास अवघ्या 6 धावांची भर घालून माघारी परतला. शाकिब अल हसन 8 धावा करुन बाद झाल्यानंतर मुशफिकुर रहीमला खातेही उघडता आले नाही. बांगलादेशचा संघही धावा करताना संघर्ष करत असताना नईमने 29 धावांची छोटी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. दुसऱ्या बाजूला महमुदुल्लाहने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने नाबाद 43 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा: टी-20 वर्ल्ड कप टीम सिलेक्शनवेळी रंगली धोनीची चर्चा

न्यूझीलंडपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने बांगलादेशचा दौरा केला होता. यावेळीही देखील बांगलादेशनं मालिका जिंकण्याची किमया करुन दाखवली होती. त्यानंतर त्यांनी आता न्यूझीलंडची हवा काढली आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही कामगिरी बांगलादेशसाठी फायदेशीरच ठरेल.

loading image
go to top