बेसबॉल लीगला स्टेडियममध्ये खचाखच गर्दी; पण कोणाची?

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 मे 2020

जागतिक क्रीडा क्षेत्र कोरोनामुळे लॉकडाऊन असताना दक्षिण कोरियात बेसबॉल लीग सुरु झाली आहे. ही लीगच सुरु झालेली नाही, तर या लीगमध्ये चीअरलीडर्ससह पुनरागमन झाले आहे.

सोल : जागतिक क्रीडा क्षेत्र कोरोनामुळे लॉकडाऊन असताना दक्षिण कोरियात बेसबॉल लीग सुरु झाली आहे. ही लीगच सुरु झालेली नाही, तर या लीगमध्ये चीअरलीडर्ससह पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर खास `चाहत्यांच्या' मदतीने स्टेडियमही  `हाऊसफुलही' करण्यात आले आहे. लीग प्रेक्षकांविना होणे अपेक्षितच होते. मात्र स्टेडियम रिकामे दिसू नये यासाठी स्टेडियममधील प्रत्येक सीटवर कार्डबोर्डद्वारे केलेल्या प्रेक्षकांची छायाचित्र लावण्यात आली आहेत. पंच मास्क लावून काम करीत आहेत, पण कोणत्याही लीगचे आकर्षण असलेल्या चीअरलीडर्सचा उत्साह कमी झालेला नाही.

मोठी बातमी ः ऑलिंपिक समितीचे उपप्रमुख कोझो ताशीमा यांना कोरोनाची लागण

प्रेक्षक स्टेडियम नाहीत असे दूरचित्रवाणीवरुन लीग पाहणाऱ्या चाहत्यांना वाटू नये यासाठी गोलंदाजांने चेंडू टाकल्यावर तसेच फलंदाजाने चेंडू बॅटने फटकल्यावर स्टेडियममध्ये त्याचा जरा जास्तच आवाज केला जात आहे. त्याचबरोबर धावा घेतल्यावरचा उत्साहही निर्माण केला जात आहे. अर्थात प्रेक्षक स्टेडियममध्ये नसल्यामुळे मैदानाबाहेर असलेल्या सहकारी खेळाडूंचे प्रोत्साहन, त्यांच्या सूचना जास्तच स्पष्टपणे ऐकू येत आहे.

मोठी बातमी ः ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना आयपीएलसाठी भारतात खेळण्याची परवानगी मिळणार का?

बेसबॉल लीग मूळ कार्यक्रमापेक्षा एक आठवडा उशिरा सुरु झाली, पण तिचे आता अमेरिकेतही थेट प्रक्षेपण होत आहे. कोरियातील थेट प्रक्षेपणास चांगले चाहते लाभत आहेत, त्यामुळे काही दिवसात सुरु होणाऱ्या फुटबॉल लीग संयोजकांचा उत्साह वाढला आहे. बेसबॉल लीग सुरु झाली असली तरी सामन्यापूर्वी प्रत्येक खेळाडू, संघासोबतचा सपोर्ट स्टाफ, सामनाधिकारी एवढेच नव्हे तर मैदानावर येणाऱ्या प्रत्येकाचे तपमान बघितले जात आहे.  मैदानाबाहेर असलेल्या सहमार्गदर्शकांसाठी मास्क बंधनकारक आहे. खेळाडूंना हाई-फाईव्हला मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर मैदानात येणाऱ्या प्रत्येकाला तंबाखू खाण्यास मनाई करण्यात आली आहे. लीगमधील एखादा खेळाडू किंवा संघातील कोणासही कोरोना झाल्यास लीग तीन आठवड्यांकरीता स्थगित करण्याचे यापूर्वीच ठरले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baseball league starts in south korea without audiance