चँपियन्स करंडकात भारत सहभागी होणार; उद्या संघनिवड

वृत्तसंस्था
रविवार, 7 मे 2017

चॅंपियन्स स्पर्धेला विरोध करून आपण माघार घेतली, तर आयसीसीकडून मिळणाऱ्या 58 कोटी डॉलरला मुकावे लागेल आणि कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली, तर हा वाद न्यायालयात जाईल, असा इशारा प्रशासकीय समितीतील सदस्य विक्रम लिमये यांनी दिला होता.

नवी दिल्ली - आयसीसी चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. या स्पर्धेसाठी उद्या (सोमवार) भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. 

चॅंपियन्स स्पर्धेला विरोध करून आपण माघार घेतली, तर आयसीसीकडून मिळणाऱ्या 58 कोटी डॉलरला मुकावे लागेल आणि कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली, तर हा वाद न्यायालयात जाईल, असा इशारा प्रशासकीय समितीतील सदस्य विक्रम लिमये यांनी दिला होता. माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे पाठिराखे असलेल्या काही राज्य संघटना माघारीसाठी ठाम आहेत, तर याचे गंभीर परिणाम बीसीसीआयवर होतील, असा इशारा प्रशासक समिती देत आहे. 

या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आज (रविवार) झालेल्या विशेष सर्वसाधारण बैठकीत चँपियन्स करंडकात सहभागी होण्याबाबत निर्णय घेण्यात आला. उत्तर आणि पूर्व विभागातील राज्य संघटना माघारीला विरोध करत आहेत, तर श्रीनिवासन यांचे वर्चस्व असलेल्या दक्षिण विभागातील संघटना माघारीला प्राधान्य देत असल्याचे समजते. आयसीसीला धडा शिकवा, अशी उघड भूमिका सौराष्ट्र क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष निरंजन शहा (पश्‍चिम विभाग) यांनी घेतली होती. 

Web Title: BCCI Clears India's Participation in the Champions Trophy