शर्थीचे प्रयत्न करुनही कुंबळेंना जावे लागले: शुक्‍ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

बीसीसीआयने हा वाद मिटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांमधून काहीही तोडगा न निघाल्याने कुंबळे यांनी प्रशिक्षक पद सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मंडळाकडून नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु झाला आहे

नवी दिल्ली - भारतीय कर्णधार विराट कोहली व प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यामधील मतभेद मिटविण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केलेले शर्थीचे प्रयत्न अपयशी ठरले, असे मंडळाचे ज्येष्ठ अधिकारी राजीव शुक्‍ला यांनी आज (बुधवार) सांगितले. भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंका दौरा करणार आहे. याआधी संघासाठी प्रशिक्षक नेमण्यात येईल, असे शुक्‍ला यांनी सांगितले.

"बीसीसीआयने हा वाद मिटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मंडळाचे सचिव व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कोहली व कुंबळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. क्रिकेटसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीच्या अध्यक्षांशीही (विनोद राय) या प्रकरणी चर्चा करण्यात आली. मात्र या प्रयत्नांमधून काहीही तोडगा न निघाल्याने कुंबळे यांनी प्रशिक्षक पद सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मंडळाकडून नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु झाला आहे. भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याआधी नवा प्रशिक्षक नेमण्यात येईल,'' असे शुक्‍ला यांनी सांगितले.

कुंबळे यांचा प्रशिक्षकपदाचा करार चॅंपियन्स स्पर्धेपर्यंतच होता. त्यामुळे चॅंपियन्स स्पर्धेला संघ रवाना होण्यापूर्वीच बीसीसीआयने त्यांचा उत्तराधिकारी शोधण्यास सुरवात केली होती. कर्णधार कोहली यानेदेखील यात आघाडी घेतली. चॅंपियन्स स्पर्धेदरम्यान प्रत्येक सामन्याच्या सरावादरम्यान कुंबळे आणि कोहली यांच्यात अभावानेच संवाद होत होता. कुंबळे चर्चेऐवजी स्वतः नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत होते. चॅंपियन्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी कोहलीने क्रिकेट सल्लागार समितीची भेट घेऊन त्यांच्यासमोर कुंबळे यांच्याबाबतची नाराजी स्पष्ट केली होती. 

माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या दिलेल्या राजीनाम्यासंदर्भात बोलताना भारताचे माजी कर्णधार व शैलीदार फलंदाज सुनील गावसकर यांनी सध्याच्या संघावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

"जर सध्याच्या संघामधील खेळाडूंना सराव सोडून खरेदी करण्याची मुभा मुक्तहस्ते देणारा प्रशिक्षक हवा असेल; तर अनिल कुंबळे कामासाठी नक्‍कीच योग्य नव्हेत,' असे कठोर टीकास्त्र गावसकर यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना सोडले.

Web Title: The BCCI failed to resolve the differences, says Shukla