
Impact Player Rule: BCCI नियम बदलणार; सामन्यात आता 11 चा नाही तर 15 चा संघ?
BCCI Impact Player Rule : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) आपल्या देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची टी 20 स्पर्धा सैयद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेच्या नियमात मोठा बदल करणार आहे. आता देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये 11 चा नाही तर 15 चा संघ मैदानात खेलण्यासाठी पात्र असतील. प्रत्येक सामन्यात अतिरिक्त चार खेळाडूंमधील कोणत्याही खेळाडूला इम्पॅक्ट प्लेअरच्या स्वरूपात संघ सामन्यावेळी वापरू शकतो. बीसीसीआय पहिल्यांदा याचा वापर देशांतर्गत स्पर्धांमध्ये करणार आहे.
टॉसच्या आधी द्यावी लागणार चार नावे
बीसीसीआय इम्पॅक्ट प्लेअर नियम देशांतर्गत क्रिकेटमध्ये तपासून पाहणार आहे. त्यामुळे आता सामन्यात प्लेईंग इलेव्हनच्या ऐवजी प्लेईंग 15 असे स्वरूप पहावयाला मिळणार आहे. बीसीसीआयने 11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत हा इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू करण्याची शक्यता आहे. या नियमानुसार सामन्यादरम्यान प्लेईंग 11 मधील कोणत्याही एका खेळाडूला बदलण्याची परवानगी मिळणार आहे. मात्र यासाठी कर्णधाराला नाणेफेकीच्यावेळी आपल्या अतिरिक्त 4 खेळाडूंची नावे देणे गरजेचे आहे. कर्णधार या 4 खेळाडूंपैकी कोणत्याही खेळाडूचा इम्पॅक्ट प्लॅअर म्हणून वापर करू शकतो.
बीसीसीआय बिग बॅशचे करणार अनुकरण
बीसीसीआयने ज्या इम्पॅक्ट प्लेअरची संकल्पना मांडली आहे ती संकल्पना ही बिग बॅश लीगमध्ये 'एक्स फॅक्टर' नावाने वापरली जात आहे. या निमयानुसार प्रत्येक संघ पहिल्या डावाच्या 10 व्या षटकापूर्वी आपल्या 12 व्या, 13 व्या खेळाडूचा वापर प्लेईंग इलेव्हनमध्ये करू शकतो. या दरम्यान, फलंदाजी न करणारा किंवा एक षटकापेक्षा जास्त षटक न टाकलेला गोलंदाज बदलून दुसऱ्या खेलाडूला संधी देता येईल. दरम्यान, बीसीसीआयच्या नियमानुसार दोन्ही डावांच्या 14 षटकापूर्वी संघ इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करू शकता.
राज्य संघटनांना पाठवले सर्क्युलर
बीसीसीआयने या संबंधी सर्व राज्य क्रिकेट संघटनांना एक सर्कुलर देखील पाठवले आहे. या सर्क्युलरनुसार सामन्यादरम्यान संघ फक्त एका इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करू शकते. संघाचा कर्णधार, प्रशिक्षक, संघव्यवस्थापक यांना मैदानावरच्या किंवा फोर्थ अंपायरला इम्पॅक्ट प्लेअरच्या बाबतीत माहिती द्यावी लागेल. सामन्यादरम्यान ज्या खेळाडूच्या ऐवजी इम्पॅक्ट प्लेअर संघात येईल त्या खेळाडूला संपूर्ण सामन्यात पुन्हा खेळण्याची संधी मिळणार नाही. तो अतिरिक्त खेळाडू म्हणून फिल्डिंग देखील करू शकणार नाही.