बीसीसीआयच्या अस्तित्वावर परिणाम होऊ नये - शिर्के

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा मला काहीच त्रास नाही, या निर्णयाचा परिणाम बीसीसीआयच्या आंतरराष्ट्रीय अस्तित्वावर पडू नये इतकेच मला वाटते, अशी प्रतिक्रिया पदच्चुत सचिव अजय शिर्के यांनी मंगळवारी व्यक्त केली. 

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा मला काहीच त्रास नाही, या निर्णयाचा परिणाम बीसीसीआयच्या आंतरराष्ट्रीय अस्तित्वावर पडू नये इतकेच मला वाटते, अशी प्रतिक्रिया पदच्चुत सचिव अजय शिर्के यांनी मंगळवारी व्यक्त केली. 

सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या शिफारशी डावलण्यावरून न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणावर आज अध्यक्षांसह सचिव यांना हटविण्याचा आदेश दिला. यानंतर शिर्के म्हणाले, ‘‘या निर्णयावर माझी काहीच प्रतिक्रिया नाही. जर, न्यायालयाने मी पदावर राहू नये असा निर्णय दिला असेल, तर त्यावर माझी काय प्रतिक्रिया असणार. बीसीसीआयशी असलेले माझे नाते आणि कार्यकाल या निर्णयाने संपुष्टात आला.’’

लोढा समितीच्या शिफारशी मानल्या गेल्या असत्या, तर ही वेळ टाळता आली असती का ? असे विचारल्यावर शिर्के म्हणाले, ‘‘या वादावर पडदा टाकण्याचा दुसरा मार्गच नव्हता. बीसीसीआय एक सदस्याची संघटना आहे. अध्यक्ष किंवा सचिव यांचा हा निर्णय नव्हता. सर्व सदस्यांनी एकमताने शिफारशी न मानण्याचा निर्णय घेतला होता.’’

न्यायालयाने निर्णय दिला तेव्हा शिर्के भारतात नव्हते. वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी लंडन येथे संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘‘इतिहासाचा विचार करण्याची गरज नाही. प्रत्येक जण इतिहासाचा वेगळ्या पद्धतीने विचार कतो. बीसीसीआयमध्ये जबाबदारी पार पाडताना माझा कुठलाही वैयक्तिक हितसंबंध नव्हता. मी यापूर्वी देखील राजीनामा दिला आहे. काम करण्यासाठी माझ्याकडे खूप काही योजना होत्या. बीसीसीआयमध्ये सचिवपदी माझी बिनविरोध निवड झाली. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मला पद सोडावे लागते याचा पश्‍चातापही होत नाही.’’

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर थेट प्रतिक्रिया देण्यास शिर्के तयार नसले, तरी त्यांनी या निर्णयाचा परिणाम  बीसीसीआयच्या आंतरराष्ट्रीय अस्तित्त्वावर होऊ नये, अशी आशा व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘या निर्णयाचा परिणाम बीसीसीआयच्या अस्तित्वावर होऊ नये इतकेच वाटते. यापुढेही बीसीसीआय जागतिक पातळीवर आपली स्थिती भक्कम ठेवेल. नवे पदाधिकारी हे काम सक्षमपणे करतील. केवळ बीसीसीआयच नाही, तर भारतीय क्रिकेट संघही तीनही प्रकारांत आपला दबदबा कायम राखेल.’’

Web Title: BCCI should not be result of the existence of