बेल्जियम प्रभावी, आफ्रिकन निष्प्रभ 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 जून 2018

विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वीच्या सराव सामन्यातील इजिप्त आणि नायजेरियाचे अपयश कायम राहिले. विश्‍वकरंडकाची उपांत्य फेरी गाठणारा पहिला आफ्रिकन संघ होण्याचे दोघांचेही स्वप्न आहे, पण स्पर्धेपूर्वी तरी चाहत्यांची निराशाच केली आहे. याचवेळी बेल्जियमने आपण विजेतेपदाच्या शर्यतीत असल्याचे दाखवले. 
 

केपटाऊन - विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वीच्या सराव सामन्यातील इजिप्त आणि नायजेरियाचे अपयश कायम राहिले. विश्‍वकरंडकाची उपांत्य फेरी गाठणारा पहिला आफ्रिकन संघ होण्याचे दोघांचेही स्वप्न आहे, पण स्पर्धेपूर्वी तरी चाहत्यांची निराशाच केली आहे. याचवेळी बेल्जियमने आपण विजेतेपदाच्या शर्यतीत असल्याचे दाखवले. 

वर्ल्ड कपचे तिकीट मिळवल्यापासून इजिप्तने एकही लढत जिंकलेली नाही. आता त्यांना बेल्जियमविरुद्ध 0-3 हार पत्करावी लागली. एडेन हॅझार्डने चमकदार कामगिरी करीत बेल्जियम हे विजेतेपदाच्या स्पर्धेत आहेत हेच दाखवले. हॅझार्डच्या पासवर रोमेलू लुकाकू याने खाते उघडले. त्यानंतर हॅझार्डने विश्रांतीस काही मिनिटे असताना गोल केला. मरौने फेलानी याने भरपाई वेळेत गोल करीत बेल्जियमचा विजय निश्‍चित केला. 

मोहंमद सालाहविना खेळणाऱ्या इजिप्तची ताकद क्वचितच दिसली. सालाहविना खेळण्याची तयारी आमच्या खेळाडूंनी करायला हवी, असे इजिप्तचे मार्गदर्शक हेक्‍टर कूपर यांनी सांगितले. सालाहच्या अनुपस्थितीत चेंडू सुरक्षितपणे कोणाकडे पास करायचा, याबाबतच इजिप्त खेळाडू संभ्रमात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

नायजेरियाकडून निराशा 
विश्‍वकरंडक पात्रता हुकलेल्या चेक प्रजासत्ताकने नायजेरियास 1-0 हरवले. टॉमस कॅलास याने 25 व्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला. नायजेरियाने गेल्या चारपैकी तीन सामने गमावले आहेत, तर एक बरोबरीत सोडवला आहे. त्यांनी क्वचितच जोशात खेळ केला. उत्तरार्धात पावसात त्यांनी खेळाचा वेग वाढवला. काही माफक संधीही निर्माण केल्या, पण गेल्याच आठवड्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार गोल स्वीकारलेल्या चेकविरुद्ध नायजेरिया एकही गोल करू शकले नाहीत. 

पनामाचे प्रयत्न अपुरे 
पनामा नॉर्वेच्या ताकदवान खेळासमोर टीकू शकले नाहीत. उत्तरार्धात पनामाने प्रतिकार केला, पण अखेर त्यांना 0-1 हार पत्करावी लागली. जोशुका किंगने सामन्याच्या सुरवातीस केलेल्या गोलने पनामाला पराजित केले. 

इस्राईलची फिफाकडे दाद 
अर्जेंटिनाने लढत ऐनवेळी रद्द केल्याबद्दल इस्राईलने फिफाकडे दाद मागितली आहे. त्याचबरोबर त्यांनी पॅलेस्टाईन फुटबॉल संघटनेने मेस्सीचे शर्ट जाळण्याचे आवाहन केले होते, त्याचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही लढत हैफाऐवजी जेरुसलेमला खेळवण्याच्या निर्णयामुळे वाद वाढल्याचा आक्षेप घेतला जात आहे. 

Web Title: Belgian Effective in football world cup practice match