किंग ऑफ गुड टाइम्सच्या फॉर्म्युला वन संघावर प्रशासक

वृत्तसंस्था
रविवार, 29 जुलै 2018

भारतामधील बॅंकांना लाखो रुपयांचे देणे असलेल्या विजय मल्ल्या यांचा "कर्जबुडवेगिरी'चा फॉर्म्युला त्यांच्याच फॉर्म्युला वन संघाच्या बाबतीत लंडनमध्ये चाललेला नाही. त्यांच्याच संघाचा ड्रायव्हर सर्जिओ पेरेझ याने न्यायालयात धाव घेतली. "किंग ऑफ गुड टाइम्स' असे बिरुद मिरविलेल्या मल्ल्या यांच्या संघावर त्यामुळे प्रशासक नेमण्यात आला आहे. 

लंडन - भारतामधील बॅंकांना लाखो रुपयांचे देणे असलेल्या विजय मल्ल्या यांचा "कर्जबुडवेगिरी'चा फॉर्म्युला त्यांच्याच फॉर्म्युला वन संघाच्या बाबतीत लंडनमध्ये चाललेला नाही. त्यांच्याच संघाचा ड्रायव्हर सर्जिओ पेरेझ याने न्यायालयात धाव घेतली. "किंग ऑफ गुड टाइम्स' असे बिरुद मिरविलेल्या मल्ल्या यांच्या संघावर त्यामुळे प्रशासक नेमण्यात आला आहे. 

लंडन उच्च न्यायालयाने हा निकाल दिला. या संघात गुंतवणूक करण्यासाठी काही नवे उद्योगपती इच्छुक आहेत. रविवारी होत असलेल्या जागतिक फॉर्म्युला वन मालिकेतील हंगेरियन ग्रांप्री शर्यतीत संघ नेहमीप्रमाणेच सहभागी होईल. 

का आले प्रशासक? 
मल्ल्या यांनी संघ विकण्याची तयारी चालविली होती, पण आपल्याला अनुकूल अटींवर व्यवहार व्हावा म्हणून ते ठाम होते. अशा वेळी योग्य गुंतवणूकदार पाठ फिरविण्याची शक्‍यता होती. त्यामुळे पेरेझने न्यायालयात धाव घेतली. मल्ल्या त्याचे 30 लाख डॉलर देणे लागतात. मर्सिडीज संघ फोर्स इंडियाला इंजिन पुरविते. त्यांचे एक कोटी 15 लाख डॉलर थकले आहेत. 

कोण आहेत प्रशासक 
न्यायालयाच्या निर्णयामुळे आणि प्रशासकांच्या नियुक्तीमुळे आता संघाविषयीचे आर्थिक निर्णय मल्ल्या यांच्या हातातून गेले आहेत. जेफ रॉली यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. ते व त्यांची "एफआरपी ऍडव्हायजरी' ही कंपनी पुढील निर्णय घेईल. संभाव्य गुंतवणूकदार या कंपनीशी संपर्क साधतील. ही कंपनी त्यांच्या प्रस्तावांचे मूल्यमापन करेल. 

परिस्थिती नियंत्रणात 
फोर्स इंडियाचे "सीओओ' ओट्‌मार झाफनॉवर यांनी संघाची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. ते निवेदन करीत असताना फॉर्म्युला वनचे "सीईओ' चेस केरी हेसुद्धा उपस्थित होते. केरी यांनी फोर्स इंडिया संघ पुढील वर्षी सहभागी व्हावा, अशीच संयोजकांची इच्छा असल्याचे ठाम प्रतिपादन केले. 

फॅशन व्यावसायिक आघाडीवर 
फोर्स इंडियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही मातब्बर इच्छुक असल्याची चर्चा फॉर्म्युला वनमध्ये सुरू आहे. कॅनडाचे अब्जाधीश उद्योगपती लॉरेन्स स्ट्रोल यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांचा मुलगा लान्स सध्या विल्यम्स संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. स्ट्रोल यांचा फॅशन व्यवसाय आहे. त्यांनी याविषयी कोणतेही भाष्य केले नाही. 

खत उद्योगपतीही इच्छुक 
रशियाचे खत व्यवसाय असलेले अब्जाधीश उद्योगपती दिमित्री मेझपीन यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यांचा मुलगा निकिता हासुद्धा रेसिंग करतो. तो जीपी 3 मालिकेत सहभागी होतो. याशिवाय फोर्स इंडियाचा "डेव्हलपमेंट ड्रायव्हर' म्हणूनही तो सक्रिय आहे.

Web Title: board of administrator appointment on good times formula one team