निखत झरीनचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात

वृत्तसंस्था
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

माजी जागतिक ब्रॉंझविजेता शिवा थापा; तसेच पूजा राणीने ऑलिंपिक चाचणी बॉक्‍सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला; पण त्याच वेळी मेरी कोमच्या भारतीय संघातील समावेशास आव्हान देत असलेल्या निखत झरीनला उपांत्य फेरीतच हार पत्करावी लागली.

नवी दिल्ली : माजी जागतिक ब्रॉंझविजेता शिवा थापा; तसेच पूजा राणीने ऑलिंपिक चाचणी बॉक्‍सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला; पण त्याच वेळी मेरी कोमच्या भारतीय संघातील समावेशास आव्हान देत असलेल्या निखत झरीनला उपांत्य फेरीतच हार पत्करावी लागली.

चार वेळा आशियाई पदक जिंकलेल्या शिवाने जपानच्या दाईसुके नारिमात्सू याचा 3-2 असा पाडाव केला. या महिन्याच्या सुरुवातीस तिसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या शिवाने मोक्‍याच्या वेळी अचूक ठोसे देत बाजी मारली. माजी आशियाई क्रीडा ब्रॉंझविजेत्या राणीने ब्राझीलच्या बित्रिझ सोएरेस हिचा एकतर्फी लढतीत पराभव केला. आशियाई रौप्यविजेत्या राणीने 5-0 अशी बाजी मारली.

बॉक्‍सिंग अभ्यासकांचे जास्त लक्ष निखत झरीनच्या लढतीकडे होते. तिने मेरो कोमची थेट निवड करण्यास आव्हान दिले होते. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपली बाजू सक्षम करण्याचा निखतचा इरादा होता; पण तिला 51 किलो गटाच्या लढतीत जपानच्या साना कावानो हिच्याविरुद्ध हार पत्करावी लागली. निखतला उपांत्य फेरीपर्यंत बाय होता आणि ही तिची स्पर्धेतील पहिलीच लढत होती आणि त्यात ती अपयशी ठरली.

वाहीमपुईया (75 किलो) एकतर्फी लढतीत जपानच्या युईतो मोरिवाकीविरुद्ध पराभूत झाला. या स्पर्धेतील सुमीत सांगवान (91 किलो), आशीष (69 किलो) आणि सिमरनजीत कौर (60 किलो) यांच्या उपांत्य ढती अद्यापि शिल्लक आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boxer nikhat zareen lost in semi final