
-नितीन मुजुमदार
रविवारी (८ जून) संध्याकाळी पॅरिसमधील लाल मातीच्या कॅनव्हासवर, निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर , निसर्ग असे काही बहारदार चित्र रेखाटत होता की बस पूछो मत! आक्रमक क्रॉस कोर्ट रॅलीज लाल मातीचा धुराळा उडवित असताना, ती रंगतदार अविस्मरणीय लढत नजाकतदार हळुवार ड्रॉप शॉट्सच्या कोंदणात, डबल हॅन्डेड बॅकहॅन्ड शॉट्सच्या शिडकाव्यात बंदिस्त करून, निसर्गाने आपले काम असे काही चोख बजावले की पार्श्वभूमीवर अनेक दशके अचल उभ्या असलेल्या आयफेल टॉवरमध्ये सुद्धा जान फुंकली गेली असेल!!
फेडरर ,नदाल आणि आता अस्ताला चाललेला जोकोविच यांच्या अविस्मरणीय लढती ,त्या लढतींमधून निर्माण झालेली रायव्हलरी, या सुंदर खेळाच्या इतिहासातील आणखी एका कालखंडाला सुवर्णयुग बहाल करत असतानाच , अल्काराझ व सिनर या उगवत्या सुपरस्टार जोडीच्या द्वंद्वांमुळे टेनिस रसिकांना आणखी एका सुवर्णयुगाच्या पहाटेची नांदी नक्की जाणविली असणार!!!!