बबिता फोगटला रौप्यपदकावर समाधान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

गोल्ड कोस्ट - भारतीय कुस्तीगिरांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक धडाका अपेक्षेनुसार सुरू केला. सुशील कुमार आणि राहुल आवारेने अपेक्षित सुवर्णपदक जिंकताना बबिता फोगट रौप्य आणि किरण ब्राँझच जिंकू शकली. 

गोल्ड कोस्ट - भारतीय कुस्तीगिरांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक धडाका अपेक्षेनुसार सुरू केला. सुशील कुमार आणि राहुल आवारेने अपेक्षित सुवर्णपदक जिंकताना बबिता फोगट रौप्य आणि किरण ब्राँझच जिंकू शकली. 

दोन ऑलिंपिक पदक जिंकलेल्या सुशीलसाठी राष्ट्रकुल स्पर्धा ही लुटुपुटुचीच स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या संघनिवडीच्या वेळी त्याची प्रतिस्पर्ध्यांबरोबर मारामारीही झाली होती. मात्र याची आठवणही चाहत्यांना होणार नाही, याची खबरदारी सुशीलने घेतली. त्याने आफ्रिकेच्या जोहानेस बोथाविरुद्ध १.२० मिनिटात दहा गुण घेत ७४ किलो गटातील सुवर्णपदक निश्‍चित केले. त्याने चारही लढतीत एकही गुण गमावला नाही. त्यापैकी तीन लढती निर्धारित वेळेपूर्वीच संपवल्या. 

राहुल आवारेने कॅनडाच्या स्टीवन ताकाहाशी याचे आव्हान १५-७ असे परतवत फ्रीस्टाईलच्या ५७ किलो गटात सुवर्णपदक पटकावले. गुणफलक दर्शवतो तेवढी लढत एकतर्फी झाली नाही. तो सुरुवातीस २-४ मागे होता. पण जोरदार प्रतिकार करीत त्याने झटपट चार गुण घेत पहिल्या फेरीअखेर आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत त्याला दुखापत झाली, पण त्याने सुवर्णपदक निसटू दिले नाही.

बबिता फोगटकडून निराशा
बबिता फोगट महिलांच्या ५३ किलो गटांत चार वर्षांपूर्वीचे सुवर्णपदक राखू शकली४ नाही. तिला कॅनडाच्या डायना वेईकरविरुद्धच्या निर्णायक साखळी लढतीत २-५ हार पत्करावी लागली. या लढतीपूर्वी ती गुणतक्‍त्यात आघाडीवर होती. मात्र बचावात्मक सुरवात केल्याचा तिला फटका बसला. डायनाने कायम लढतीवर वर्चस्व राखले. तिचे या स्पर्धेतील हे तिसरे पदक. तिने २०१० च्या दिल्ली स्पर्धेत रौप्य, तर २०१४ च्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. 

किरणनेही बबितापेक्षा जास्त निराशा केली तिला ७६ किलो गटात ब्राँझ जिंकल्याचेच समाधान लाभले. तिने मॉरिशसच्या कातौस्किया पारिधवन हीच्याविरुद्ध १०-० आघाडी घेत तिसऱ्या क्रमांकाची लढत जिंकली. तिला उपांत्य फेरीत नायजेरियाच्या ब्लेसिंग औन्येबुची हिने १०-० असेच हरवले होते.

Web Title: common wealth games babita fogat wrestling