शूटिंग रेंजवर ‘हीना’ने भरले ‘सुवर्णरंग’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

गोल्ड कोस्ट - मुंबईची सून असलेल्या हीना सिद्धूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय नेमबाजांचा सुवर्णवेध कायम राखला. त्यामुळे पुरुषांच्या रायफल प्रोन प्रकारात भारतीयांना रिक्त हस्ते परतावे लागल्याच्या वेदना काहीशा कमी झाल्या.

गोल्ड कोस्ट - मुंबईची सून असलेल्या हीना सिद्धूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय नेमबाजांचा सुवर्णवेध कायम राखला. त्यामुळे पुरुषांच्या रायफल प्रोन प्रकारात भारतीयांना रिक्त हस्ते परतावे लागल्याच्या वेदना काहीशा कमी झाल्या.

हीनाला स्पर्धेपूर्वी दुखापतीने सतावले होते. त्यातच दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत मनू भाकरने सहज मागे टाकले होते. त्यातच २५ मीटर पिस्तूलच्या प्राथमिक फेरीत अनू राज सिंगने तिला सहज मागे टाकले होते. पात्रतेनंतर साडेतीन तासांनी झालेल्या अंतिम फेरीत अन्नू निराशा करीत असताना हीनाने सुरवातीच्या पिछाडीनंतर कामगिरी उंचावत सुवर्णवेध घेतला. अन्नू अंतिम फेरीत सहावी आली.

सातव्या शॉटपासून हीनाने आघाडी घेतली आणि ऑस्ट्रेलियाच्या एलेना गॅलिआबोविच हिला ३८-३५ असे मागे टाकत बाजी मारली. हीनाला अंतिम फेरीतील स्पर्धा विक्रमापेक्षाही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवल्याचे समाधान जास्त होते. 

चैन, गगनची निराशा
भारतास हमखास सुवर्णपदक अपेक्षित असलेल्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात चैन सिंग चौथा, तर गगन नारंग सातवा आला. दोघांचीही पात्रतेतील कामगिरीनुसार एका क्रमांकाने घसरण झाली. अंतिम फेरीत दोघांचीही सुरवात समाधानकारक होती; पण तिसऱ्या आणि चौथ्या फेरीतील अपयशामुळे गगन १४२.३ गुणांपर्यंतच पोचू शकला. अनुभवी चैन सिंग दडपणाखाली ९.५, ९.३ गुणांचाच वेध घेऊ शकला. त्यामुळे तो पदकाच्या शर्यतीतून बाद झाला.

ट्रिगर जरा जास्तच त्रास देत होता; मात्र हात काहीसा बधिर झाल्याने आज हे कदाचित जाणवत नव्हते. दहा मीटर पिस्तूलच्या अंतिम फेरीच्या वेळी तर बोटांना काही स्पर्शच जाणवत नव्हता. त्यानंतर फिजिओथेरपी सुरू केली होती. आज मात्र फिजिओंना दूरच ठेवले. जे काही व्हायचे असेल ते होऊ दे, हाच विचार केला. सुदैवाने चांगले घडले.
- हीना सिद्धू

Web Title: common wealth games shooting heena sidhu gold medal