डबल ट्रॅपमध्ये श्रेयासीचा सुवर्णवेध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

गोल्ड कोस्ट - श्रेयासी सिंहने राष्ट्रकुल क्रीडा नेमबाजीतील महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेतला. ऑलिंपिक तसेच विश्वकरंडक स्पर्धेतून बाद झालेल्या या डबल ट्रॅप प्रकारात श्रेयासीने भारतास सुवर्ण जिंकून दिले, तर याच प्रकारात अंकुर मित्तलने ब्राँझपदक मिळवले. 

गोल्ड कोस्ट - श्रेयासी सिंहने राष्ट्रकुल क्रीडा नेमबाजीतील महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेतला. ऑलिंपिक तसेच विश्वकरंडक स्पर्धेतून बाद झालेल्या या डबल ट्रॅप प्रकारात श्रेयासीने भारतास सुवर्ण जिंकून दिले, तर याच प्रकारात अंकुर मित्तलने ब्राँझपदक मिळवले. 

शॉट गन प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी श्रेयासी पहिलीच भारतीय महिला आहे. तिचे आणि ऑस्ट्रेलियाच्या एम्मा कॉक्‍स हिचे अंतिम फेरीत समान ९६ गुण झाले. शूटऑफमध्ये श्रेयासीने २-१ अशी बाजी मारत सुवर्णपदक जिंकले. याच प्रकारात राजवर्धन राठोड यांनी अथेन्स ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते; पण रिओ ऑलिंपिकनंतर नेमबाजीचे स्वरूप बदलताना डबल ट्रॅप प्रकारास बाद करण्याचे ठरले आहे. 

श्रेयासीचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे पहिलेच सुवर्णपदक आहे. गतस्पर्धेत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते; तर आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने ब्राँझ जिंकले होते. तिचे वडील तसेच आजोबांनी भारतीय नेमबाजी संघटनेचे अध्यक्षपद भूषवले आहे. अंकुर मित्तलने पुरुषांच्या डबल ट्रॅपमध्ये ब्राँझ जिंकताना भारताच्याच महंमद असाबला मागे टाकले. अंकुरचे ५३ गुण झाले.

चार वर्षांपूर्वी सुवर्णपदक हुकले होते. या वेळीही सुरवातीस मागे होते. प्रतिकाराची माफक संधी साधली. शूटऑफमध्ये चांगली कामगिरी झाल्यामुळे जास्त खूश आहे. 
- श्रेयासी सिंह

जितू रायकडून निराशा
ओमप्रकाश मिथ्रावाल याने ५० मीटर पिस्तूल प्रकारात २०१.१ गुणांसह ब्राँझपदक जिंकले; पण आवडत्या या स्पर्धेत जितू राय आठवा आला. दोन दिवसांपूर्वी जितूने दहा मीटर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकताना पात्रतेतील कामगिरी उंचावली होती; पण त्याची पुनरावृत्ती तो करू शकला नाही. अंतिम फेरीत बाद झालेला तो पहिला नेमबाज होता.

Web Title: common wealth games shreyasi sinh shooting