सिंधू-साईना आमनेसामने

वृत्तसंस्था
रविवार, 15 एप्रिल 2018

गोल्ड कोस्ट - बॅडमिंटनमधील भारतीयांची मक्‍तेदारी राष्ट्रकुल स्पर्धेत उद्या अखेरच्या दिवशी पाहायला मिळणार आहे. महिलांच्या एकेरीत पी. व्ही. सिंधू विरुद्ध साईना नेहवाल, असा सुवर्णपदकासाठी सामना होणार आहे; तर जागतिक क्रमवारीत नुकताच अव्वल स्थानी आलेल्या किदांबी श्रीकांतनेही पुरुषांच्या एकेरीत अंतिम फेरीत मजल मारली आहे.

गोल्ड कोस्ट - बॅडमिंटनमधील भारतीयांची मक्‍तेदारी राष्ट्रकुल स्पर्धेत उद्या अखेरच्या दिवशी पाहायला मिळणार आहे. महिलांच्या एकेरीत पी. व्ही. सिंधू विरुद्ध साईना नेहवाल, असा सुवर्णपदकासाठी सामना होणार आहे; तर जागतिक क्रमवारीत नुकताच अव्वल स्थानी आलेल्या किदांबी श्रीकांतनेही पुरुषांच्या एकेरीत अंतिम फेरीत मजल मारली आहे.

गुडघा दुखापतीमुळे सांघिक गटातून माघार घेणाऱ्या सिंधूने उपांत्य सामन्यात गतविजेत्या मिशेली ली हिचा अवघ्या २६ व्या मिनिटांत २१-१८, २१-८ असा धुव्वा उडवला. मात्र माजी नंबर वन साईनाला क्रिस्ती गिलमोरचे आव्हान मोडून काढण्यासाठी ६८ मिनिटे झुंझावे लागले, अखेर तिने २१-१४, १८-२१, २१-१७ असा विजय मिळवला. दोन भारतीयांमध्येच अंतिम लढत होणार असल्यामुळे सुवर्ण आणि रौप्यपदक निश्‍चित झाले आहे. 

सध्याच्या स्थितीत सिंधू साईनापेक्षा सरस असली तरी या दोघांमधील लढतीत साईना सरस ठरलेली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेत साईनाने सिंधूला हरविले होते. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेतील उपांत्य सामन्यात सिंधू एकतर्फी जिंकली असली आणि साईनाला प्रतिकार करावा लागला असला तरी या दोघींमधली लढत चुरशीची होऊ शकेल.

श्रीकांतकडून आता सुवर्णपदकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळाल्यानंतर त्याला प्रतिष्ठा सिद्ध करण्यासाठी सुवर्णपदक जिंकावे लागणार आहे; परंतु अंतिम सामन्यात त्याच्यासमोर ली चोंग वेईचे आव्हान आहे. वेई हा तीन वेळा ऑलिंपिक रौप्यपदक जिंकणारा खेळाडू आहे. उपांत्य सामन्यात त्याने भारताच्या एच. एस. प्रणोयचे आव्हान २१-१६, ९-२१, २१-१४ असे मोडून काढले; तर श्रीकांतने इंग्लंडच्या राजीव ओसेफचा २१-१०, २१-१७ असा पराभव केला. 

सात्त्विक-चिरागलाही सुवर्णची संधी
सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या नवोदित जोडीलाही पुरुष एकेरीच्या सुवर्णपदकाची संधी मिळणार आहे. उपांत्य सामन्यात त्यांनी श्रीलंकेच्या सचिन डायस आणि गुणेतिलेका यांच्यावर २१-१८, २१-१० असा विजय मिळवला. सुवर्णपदकासाठी त्यांच्यासमोर रिओ ऑलिंपिक ब्राँझपदक विजेत्या मार्कस एलिस आणि ख्रिस लॅंगिर्डे यांचे आव्हान आहे.

Web Title: Commonwealth Games Gold Coast badminton