आई-वडील, देशाला सुवर्णभेट - साईना

वृत्तसंस्था
सोमवार, 16 एप्रिल 2018

सिंधू पुन्हा निर्णायक लढतीत पराजित झाली, असे म्हणणे चुकीचे आहे. हे कोणाबद्दलही घडू शकते. खडतर लढतींचा निकाल काहीही लागू शकतो. हे माझ्याबाबतीतही घडले आहे. माझा स्टॅमिना संपत होता, म्हणून मी आक्रमण टाळत होते. रॅली संपविण्याकडे मी लक्ष देत होते. ती रॅलीज चांगल्या खेळली. 
- साईना नेहवाल

गोल्ड कोस्ट - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक हे माझ्याकडून आई-वडिलांना, तसेच देशाला गिफ्ट आहे. रिओतील अपयशानंतर सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे अवघड आहे, असे साईना नेहवालने सांगितले. 

या विजेतेपदाने सर्व टीकाकारांना उत्तर दिले, अशीच फुलराणीची भावना होती. ‘‘हे सुवर्णपदक माझ्यासाठी ऑलिंपिक पदक आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानाखालोखाल महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याला मानाचीच जागा मिळणार. आई-वडील, देशवासीयांना या पदकाचे मी गिफ्ट दिले आहे. रिओ ऑलिंपिकच्यावेळी दुखापत झाली, त्या वेळी सर्वांना निराश केले होते,’’ असे साईनाने सांगितले. 

साईना-सिंधूविरुद्धची पाचपैकी चौथी लढत जिंकल्याने खूश होती. ‘‘सामना खूपच चुरशीचा झाला. त्यातच गेले दहा-बारा दिवस सतत खेळत होते, त्यामुळे लढत जास्तच खडतर झाली होती. ती उंच आहे. तिचे पायही लांब आहेत. ती माझ्यापेक्षा वेगाने कोर्ट कव्हर करते. त्यामुळे मला सतत पळावे लागत होते. गेल्या काही महिन्यांत वजन पाच किलोने कमी केले आहे, त्यामुळे वेगाने खेळ करू शकले’’, असे साईनाने सांगितले. 

साईना तसेच सिंधूवर या लढतीच्यावेळी जास्तच दडपण होते. ‘‘या प्रकारच्या लढतीत आपला खेळ करणे महत्त्वाचे असते. आमच्या दोघींत निकोप स्पर्धा आहे. त्याचा चाहते आनंद घेतात. दोघींवर नक्कीच दडपण होते. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या असलेल्या खेळाडूविरुद्ध विजय सोपा नसतो,’’ असे साईनाने सांगितले. 

वडिलांसाठी कायम लढत राहणार
वडिलांची क्रीडानगरीत व्यवस्था न झाल्यामुळे स्पर्धेतून माघारीचा इशारा साईनाने दिला होता. मी वडिलांसाठी कुठेही भांडायला मागे-पुढे पाहणार नाही. मी वडिलांना महत्त्व देते, असे अनेक जण म्हणतात; पण ते जर नसते, तर मी जिंकूच शकले नसते. त्यांची निवासव्यवस्था होणार नाही हे समजले असते, तर हॉटेल बुकिंग केले असते. 

दीर्घ प्रवासानंतर त्यांचा मुक्काम कुठे हा प्रश्‍न आल्यावर काय होणार. दोन दिवस मला नीट झोप लागत नव्हती. ते दोन दिवस क्रीडानगरीबाहेर बसून होते. ते डायनिंग हॉलमध्येही येऊ शकत नव्हते. मग येथे येऊन काय साधणार होते. मी भांडले, हा प्रश्‍न आहे. ते लोकांना आवडले नाही. मी का नाही माझ्या वडिलांसाठी भांडणार, अशी संतप्त विचारणा तिने केली.

Web Title: Commonwealth Games gold medal is my gift to the parents as well as to the country