Tokyo Olympic 2020 : ड्रॅगनच्या ऑलिंपिक वर्चस्वास कोरोनाचा फटका?

Tokyo_Olympic_2020
Tokyo_Olympic_2020

बीजिंग : शतकातील प्रत्येक ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत चीन अव्वल आला आहे; पण ड्रॅगनच्या या वर्चस्वास कोरोनाचा मोठा फटका बसणार, असे दिसत आहे. ऑलिंपिक वर्षात त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभागावरच नव्हे, तर ऑलिंपिक पात्रता स्पर्धा सहभागावरही परिणाम झाला आहे. 

ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या किंवा पात्रतेची संधी असलेल्या एकाही चिनी खेळाडूस कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त नाही; पण त्यांचे झटके त्यांना बसले आहेत. आता ऑस्ट्रेलियाने ऑलिंपिक पात्रता महिला फुटबॉल स्पर्धेसाठी आपले दरवाजे चीन संघासाठी खुले केले; पण हे सर्वच ठिकाणी घडण्याची शक्‍यता नाही.

फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान जगभरात शंभर ऑलिंपिक पात्रता स्पर्धा होतील. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने यजमान देशांना आमच्या खेळाडूंना शक्‍य तितके साह्य करण्यास सांगितले आहे, असे चीन ऑलिंपिक समितीचे उपाध्यक्ष लिऊ गुओयॉंग यांनी सांगितले; पण किती देश यास तयार होतील, हा प्रश्नच आहे.

चीनचा महिला फुटबॉल संघ ऑस्ट्रेलियात ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत खेळत आहे; पण या संघातील वुहानमधील वॅंग शॉंग घरच्या छतावर मास्क लावून सराव करीत आहे. आता चीन महिला फुटबॉल संघ नशीबवान म्हणायला हवा. त्यांच्या महिला हॅंडबॉल संघास हंगेरीतील पात्रता स्पर्धेतून माघार घेणे भाग पडले.

मेलबर्नच्या विश्वकरंडक पात्रता जिम्नॅस्टिक मालिका स्पर्धेतही चीन स्पर्धक नसतील. चीनमधील बॉक्‍सिंग, बास्केटबॉल, सेलिंगच्या ऑलिंपिक पात्रता स्पर्धा अन्यत्र होतील. चीनची ताकद असलेल्या बॅडमिंटन तसेच टेबल टेनिस संघाचा सराव यापूर्वीच चीनबाहेर सुरू झाला आहे; पण ज्युदो संघ तेवढा नशीबवान नाही. त्यांची पॅरिस ग्राप्रि स्पर्धा हुकली आहे. 

ऑलिंपिकसाठी संघ किती सदस्यांचा? 

चीनचा मॉडर्न पेंटथलॉन संघ इजिप्त स्पर्धेतील पूर्वतयारी करीत आहे. संघटनेचे पदाधिकारी या संघाच्या प्रवासाची तसेच देशाबाहेरील शिबिराची तयारी करीत आहेत. चीनचे ऍथलिटस्‌ ट्रेड मिलवर धावत आहेत. अश्वारोहणातील स्पर्धकांचा ताप रोज दोनदा बघितला जात आहे. आता या परिस्थितीत चीनच्या किती सदस्यांचा संघ ऑलिंपिकसाठी असेल, हा प्रश्नच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com