Ben Stokes : सूर्यकुमारला रोखावे लागणार : बेन स्टोक्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ben Stokes

Ben Stokes : सूर्यकुमारला रोखावे लागणार : बेन स्टोक्स

ॲडलेड : सूर्यकुमार यादवने या वर्षी टी-२० मध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या विश्‍वकरंडकातही त्याच्या बॅटमधून धावाच धावा निघत आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीआधी इंग्लंडच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांना सूर्यकुमार यादवचा झंझावात रोखावा लागणार आहे, असे मत व्यक्त करतानाच इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने विराट कोहलीलाही कमी लेखून चालणार नाही, असेही म्हंटले आहे.

सूर्यकुमार शानदार फॉर्ममध्ये आहे. फलंदाजीला खेळपट्टीवर उतरल्यापासूनच त्याची धडाकेबाजी फलंदाजी सुरू होते. त्याचे काही फटके तर विचार करायला लावणारे असतात. आमच्या गोलंदाजांना त्याला रोखावेच लागणार आहे, असे स्टोक्स पुढे आवर्जून सांगतो. विराटबाबत स्टोक्स म्हणतो, विराटने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

बलाढ्य भारताचे आव्हान

बेन स्टोक्स स्वत:च्या इंग्लंड संघाबद्दल म्हणाला, आम्ही आतापर्यंत आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळलेलो नाही. अव्वल दर्जाचे क्रिकेट न खेळता आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आता आमच्यासमोर भारतासारख्या बलाढ्य संघाचे आव्हान असणार आहे. भारतीय संघामध्ये एकापेक्षा एक असे शानदार खेळाडू आहेत, पण आम्ही प्रतिस्पर्ध्यांचा जास्त विचार न करता आमच्या संघावर लक्ष देणार आहोत.

ॲडलेड येथील मैदानावर ही लढत खेळविण्यात येणार आहे. येथील खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज ठसा उमटवू शकतील, पण त्यांचा प्रभाव किती प्रमाणात असेल, याबद्दल सांगता येत नाही.

-बेन स्टोक्स, इंग्लंडचा अष्टपेलू