esakal | कोरोना संकटात Fabiflu च्या घोषणेनंतर 'गंभीर' ट्रोल

बोलून बातमी शोधा

Gautam Gambhir
कोरोना संकटात Fabiflu च्या घोषणेनंतर 'गंभीर' ट्रोल
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. माजी क्रिकेटर आणि विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी आपल्या मतदार संघातील लोकांसाठी मोफत फेबीफ्लू देण्याची घोषणा केलीय. गंभीर हे पूर्व दिल्लीचे विद्यमान खासदार आहेत. कोरोना नियंत्रित ठेवण्यावर फेबीफ्लू गोळी उपयुक्त ठरत आहे. मतदार संघातील लोक पूर्व दिल्लीतील जागृती एनक्लेव्ह स्थित कार्यालयात येऊन फेबीफ्लू घेऊन जाऊ शकता, असे म्हटले आहे. या निर्णयावरुन एका बाजूला गंभीर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून दुसरीकडे काही लोक त्यांना ट्रोलही करत आहेत.

गौतम गंभीर यांनी ट्विटच्या माध्यमातून कोरोनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या फेबीफ्लूसंदर्भात ट्विटरच्या माध्यमावरुन घोषणा केलीये. सकाळी 10 ते सायकांळी 5 या वेळेत प्रिस्किप्शन व आधारकार्ड दाखवून गरजू लोक फेबीफ्लू घेऊन जाऊ शकतात. या ट्विटनंतर गौतम गंभीर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होता. नो व्हिजन, नो डायरेक्शन, दिल्ली मृत्यूच्या जाळ्यात अडकलीये, असे म्हणत गंभीर यांनी केजरीवालांनी राजीनामा द्यावा, असे म्हटले होते.

हेही वाचा: लॉकडाऊनमध्येही IPL 'अनलॉक' का? जाणून घ्या यामागची कारणे

गौतम गंभीर यांनी मोफत औषध वाटप करण्याची घोषणा केल्यानंतर काहींनी त्यांना ट्रोलही केले आहे. एक क्रिकेटर म्हणून गौतम गंभीर आवडतात. पण राजकारणात जाऊन त्यांनी स्वत:मधील प्रामाणिकपणा विकलाय. स्वत: आयपीएलमध्ये व्यस्त आहेत. आणि दिल्लीच्या जनतेला मदत करण्याची भाषा बोलतात. असे ट्विट एका नेटकऱ्यांने केले आहे. ट्विटसोबत त्याने गौतम गंभीर यांचा आयपीएलसंदर्भातील फोटोही शेअर केलाय.

एका युजर्सने गौतम गंभीर यांचा मागील वर्षीच्या ट्विटचा दाखला दिलाय. ज्यावेळी दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रित होती त्यावेळी गौतम गंभीर केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत कोरोना नियंत्रणात आणल्याचे श्रेय घेत होते. आता ते अरविंद केजरीवाल यांच्याकडे राजीनामा मागत आहेत, असा उल्लेख केलाय.