
आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एवढ्या झटपट सहभागी होणे याचा शरीरावर परिणाम होतो. प्रत्येक महिन्यात आम्ही अनेक सामने खेळत आहोत. त्यामुळे शारिरीक आणि मानसिक तंदुरुस्ती कायम ठेवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागत आहे.
तौरंगा : भारतीय क्रिकेट संघाच्या व्यस्त कार्यक्रमावर कर्णधार विराट कोहलीने केलेल्या वक्तव्याला सलामीवीर केएल राहुलनेही समर्थन दर्शविले आहे. महिनाभरात एवढे सामने खेळणे खरंच कठीण असल्याचे राहुलने म्हटले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
भारताने गेल्या काही दिवसांमध्ये सलग सामने खेळले असून, या व्यस्त कार्यक्रमावरून खेळाडूंकडून नाराजी दर्शविण्यात येत आहे. विराट कोहलीने नुकतेच भारतीय संघ सतत खेळत असल्याने वेळापत्रकावरून टीका केली होती. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर लगेच न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळला आहे. या मालिकेत भारताने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला असला तरी अद्याप एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत खेळायचे आहे. यानंतर मायदेशात आयपीएलमध्ये खेळाडू उतरतील.
गेल्या दोन मालिकांमध्ये सलामीवीरासह यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडणाऱ्या राहुलने म्हटले आहे, की आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एवढ्या झटपट सहभागी होणे याचा शरीरावर परिणाम होतो. प्रत्येक महिन्यात आम्ही अनेक सामने खेळत आहोत. त्यामुळे शारिरीक आणि मानसिक तंदुरुस्ती कायम ठेवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागत आहे. आमच्यासाठी गेल्या काही मालिका खरंच आव्हानात्मक राहिल्या आहेत. सध्यातरी आमच्या मनात टी-20 विश्वकरंडक जिंकणे एवढेच आहे. यासाठी आमची जोरदार तयारी सुरु आहे.