भारत हॉकीत जिंकला; क्रिकेटमध्ये हारला!

टीम ई सकाळ
रविवार, 18 जून 2017

लंडन - भारतीय हॉकी संघाने आज जागतिक हॉकी लीगमध्ये पाकिस्तानचा 7-1 असा निर्णायक पराभव केला. मात्र क्रिकेटमध्ये भारताला यश गवसले नाही. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंच्या तडाखेबंद फलंदाजी आणि तेवढ्याच प्रभावी गोलंदाजीपुढे भारतीय खेळाडू टिकाव धरू शकले नाहीत. पाकिस्तानविरुद्ध भारताला 180 धावांनी मानहानीकारक दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

आज (रविवार) भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानाची सुरुवात जबरदस्त झाली. सलामीवीर फखर जमान याचे तडाखेबंद शतक (114 धावा 106 चेंडू) हे पाकिस्तानच्या धावसंख्येमधील प्रमुख वैशिष्ट्य ठरले. जमान याच्यासह अझर अली (59 धावा, 72 चेंडू), बाबर आझम (46 धावा, 52 चेंडू), मोहम्मद हफीझ (57 धावा, 37 चेंडू) या इतर पाकिस्तानी फलंदाजांनीही भारतीय गोलंदाजीची पिसे काढण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. भारताच्या वतीने भुवनेश्‍वर कुमार, हार्दिक पंड्या आणि केदार जाधव यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. त्यामुळे पाकिस्तानने भारतासमोर 339 धावांचे विशाल आव्हान ठेवले.

त्यानंतर मैदानात भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. तिसऱ्या चेंडूवर भारताच्या खात्यात शून्य धावा असताना रोहित शर्मा बाद झाला. तेथून भारतीय संघाला उतरती कळा लागली. संघाच्या खात्यात 72 धावा असताना सहा गडी बाद झाले होते. मात्र त्यानंतर हार्दिक पंड्याने आशा पल्लवित करण्याचा प्रयत्न केला. त्याने अवघ्या 43 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने 76 धावा केल्या. मात्र रविंद्र जडेजा मैदानात असताना त्याच्यासोबत एक धाव घेताना समन्वय चुकला आणि पंड्या बाद झाला. तेथेच सामन्याचे चित्र फिरले आणि उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या. उर्वरित औपचारिका पूर्ण करत संपूर्ण भारतीय संघ अवघ्या 158 धावांत गारद झाला. पाकिस्तानच्या वतीने हसन अली आणि मोहम्मद आमीर यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत प्रत्येकी तीन बळी घेतले.

Web Title: cricket news india lose pakistan won champions trophy