पाकिस्तान क्रिकेटपटूंच्या बर्गर पार्टीत सानिया मिर्झाही 

Sania Mirza
Sania Mirza

मॅंचेस्टर / इस्लामाबाद : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला भारताविरुद्ध एकतर्फी हार पत्करावी लागल्यानंतर पाक खेळाडू सामन्याच्या आदल्या दिवशी बर्गर पार्टी करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सामन्याच्या आदल्या दिवसाचा नसून त्यापूर्वीच्या दोन दिवसाचा असल्याचे सांगत पाक मंडळाने खेळाडूंची बाजू घेतली, पण या व्हिडिओतील सानिया मिर्झाच्या सहभागाचीही चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. 

पाकिस्तानने भारताविरुद्ध हार पत्करल्यानंतर अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारीत झाले आहेत. त्यात सामन्याच्या आदल्या दिवशी पाक खेळाडू बर्गर खात असल्याचे दाखवले आहे. या चित्रफितीत शोएब मलिक, सर्फराज अहमद मोठ्या प्रमाणावर बर्गरचा आस्वाद घेत असल्याचे दिसत आहे. ते पाहून पाकच्या पाठीराख्यांनी हे खेळाडू क्रिकेटसाठी नाही, तर दगलसाठीच योग्य असल्याची टिप्पणी केली आहे. 

पाक खेळाडूंनी शिशा कॅफेमध्ये बर्गर आणि डेझर्टस्‌चा मोठ्या प्रमाणावर आस्वाद घेतला. हे घडल्यावर काय होणार, खेळाडू मैदानावर जांभयाच देणार असे ट्रोल केले आहे. या चित्रफितीतील सानिया मिर्झाच्या सहभागाबद्दलही प्रश्न विचारण्यात आले आहेत. पाक खेळाडू बर्गर खात असल्याचे दाखवणारा व्हिडिओ लढतीच्या दोन दिवसांपूर्वीचा आहे, असे पाक मंडळाने सांगितले आहे. 

सानिया मिर्झाने या चित्रफितीमधील आपला सहभाग नाकारलेला नाही. त्या दिवसाची पार्टीचे रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तीने आमच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ केल्याची टीका सानियाने केली आहे. त्याचबरोबर खेळाडूंनी आपल्या कुटुंबियांसमवेत बाहेर जाऊन खाणे, यात काहीही गैर नसल्याचा दावाही केला आहे. 

खेळाडू त्यावेळी संघव्यवस्थापनाची पूर्वपरवानगी घेऊनच गेले होते. त्यांनी कोणत्याही नियमाचा भंग केलेला नाही असे पाक मंडळाने सांगितले आहे. मात्र खेळाडूंच्या कुटुंबियांना संघासोबत राहण्यास परवानगी दिल्यावरही टीका होत आहे, त्यामुळेच सर्फराजने मैदानात जांभया दिल्याचेही म्हंटले जात आहे.  

पाक क्रिकेट मंडळाचा खुलासा खेळाडूंकडून कर्फ्यूचे उल्लंघन नाही 
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्याच्या आदल्यादिवशी खेळाडूंनी कर्फ्यूचे उल्लंघन केले नव्हते, असा खुलासा पाकिस्तानी क्रिकेट मंडळाच्या प्रवक्‍त्याने केला. या सामन्यातील मानहानिकारक पराभवानंतर माजी खेळाडूंनी संघावर टीकेची झोड उठविली आहे. 

सलग दुसऱ्यांदा शून्यावर गारद झालेला शोएब मलिक भारतीय टेनिसपटू असलेली पत्नी सानिया मिर्झा आणि दोन खेळाडूंसह एका कॅफेमध्ये खात असल्याचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे. सामन्यादरम्यान पाक कर्णधार सर्फराज अहमद याने जांभई दिल्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. खेळाडूंनी आदल्यादिवशी मध्यरात्री उशिरापर्यंत पिझ्झा पार्टी केल्याचा दावाही मॅंचेस्टरमधील काही क्रिकेटप्रेमींनी केला आहे. 

या पार्श्वभूमीवर पाक मंडळाचा प्रवक्ता म्हणाला की, आखून दिलेल्या संचारबंदीच्या वेळेनंतर (कर्फ्यू) खेळाडू संघाच्या हॉटेलबाहेर नव्हते. कोणत्याही खेळाडूने याचे उल्लंघन केलेले नाही. संबंधित व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीचा आहे. सामन्याच्या आदल्यारात्री सर्व खेळाडू वेळेत आपापल्या रूममध्ये परतले होते. कुटुंबीयांबरोबर बाहेर जाणारे खेळाडू संघ व्यवस्थापकांची रीतसर परवानगी घेत आहेत. 
एका चाहत्याने 16 जून रोजी व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात शोएब-सानिया यांच्यासह इमाम उल हक आणि वहाब रियाझ मध्यरात्री दोन वाजता पार्टी करीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com