किवींचा पुन्हा ये रे माझ्या मागल्या शो; कांगारु टी-20 चॅम्पियन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Australia Team
किवींचा पुन्हा ये रे माझ्या मागल्या शो; कांगारु टी-20 चॅम्पियन!

किवींचा पुन्हा ये रे माझ्या मागल्या शो; कांगारु टी-20 चॅम्पियन!

AUS vs NZ, T20 World Cup Final: आयसीसीच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवाची मालिका खंडीत करण्यात न्यूझीलंडचा संघ पुन्हा एकदा अपयशी ठरला. 2015, 2019 आणि त्यानंतर युएईच्या मैदानात तिसऱ्यांदा वर्ल्ड कप उंचावण्याची त्यांची संधी हुकली. न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियासमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना फिंच स्वस्तात माघारी फिरला. पण त्यानंतर डेविड वॉर्नरची फटकेबाजी आणि मिशेल मार्शनं केलेली अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने पहिला टी-20 वर्ल्ड कप उंचावला.

हेही वाचा: T20 WC Final आयुष्यात पहिल्यांदाच स्टार्कची वाईट धुलाई

2010 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाला फायनलमध्ये इंग्लंडकडून पराभव स्विकारावा लागला होता. वर्ल्ड कप उंचावण्याची हुकलेली ही संधी त्यांनी युएईच्या मैदानात भरून काढली. मिशेल मार्श 50 चेंडूत 50 धावा करुन नाबाद राहिला. दुसरीकडे ग्लेन मॅक्सवेलनं 18 चेंडूत 28 धावांची खेळी करत चौकाराने संघाचा विजय निश्चित केला. ऑस्ट्रेलियाने 8 गडी आणि 7 चेंडू राखून विजय नोंदवला.

हेही वाचा: Video: विल्यमसनचा 'बाएं हाथ का खेल'... लगावला एकहाती षटकार!

न्यूझीलंडच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना डेविड वॉर्नर आणि फिंच जोडीने ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या धावफलकावर अवघ्या 15 धावा असताना बोल्टने फिंचला झेलबाद केले. तो 5 धावांची भर घालून चालता झाला. त्यानंतर वॉर्नर आणि मिशेल मार्श जोडीनं संघाचा डाव सावरला. या जोडीनं 92 धावांची भागीदारी केली. वॉर्नरच्या रुपात बोल्टने संघाला आणखी एक यश मिळवून दिले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मिशेल मार्श शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने 50 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने नाबदा 77 धावांची खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेलनं 18 चेंडूत 28 धावा केल्या.

loading image
go to top