Hasan Ali Catch | कॅच सोडणाऱ्या हसन अलीसाठी पाक महिला क्रिकेटरचे विशेष ट्वीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hasan-Ali-Bisma-Maroof

हसन अलीने कॅच सोडल्यानंतर संपूर्ण सामनाच फिरला

कॅच सोडणाऱ्या हसन अलीसाठी पाक महिला क्रिकेटरचे खास ट्वीट

sakal_logo
By
विराज भागवत

भारताला पहिल्या सामन्यात पराभूत करणाऱ्या पाकिस्तानचा टी२० वर्ल्डकपमधील प्रवास काल थांबला. सेमीफायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्यांना पराभूत केले. पाकिस्तानने २० षटकात १७६ धावा ठोकल्या होत्या. हे आव्हान पेलताना ऑस्ट्रेलियाला शेवटच्या २ षटकांत २०पेक्षाही जास्त धावा हव्या होत्या. त्यावेळी हसन अलीने मॅथ्यू वेडचा एक झेल सोडला आणि तिथून सामना पूर्णपणे पलटला. पुढील तीन चेंडूत तीन सिक्सर लगावत वेडने ऑस्ट्रेलियासाठी सामना जिंकला. या घटनेनंतर हसन अलीला प्रचंड टीकेचा सामना करावा लागला. पण, पाकिस्तानची महिला क्रिकेटपटू बिसमा मारूफ हिने त्याला धीर देत एक विशेष ट्वीट केले.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

"प्रिय हसन अली, तू अनेक वेळा पाकिस्तान संघाला आणि देशाला अभिमानाचे क्षण दिले आहेस. सर्वोत्तम कामगिरी करत तू पाकिस्तानला अनेक मोठ्या स्पर्धा जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहेस. खेळावर तुझं अतोनात प्रेम आहे याची आम्हा साऱ्यांनाच कल्पना आहे. मैदानावरील तुझी ऊर्जा आणि हजेरी लक्षणीय असते. तू खचून जाऊ नकोस. खंबीर राहा आणि दमदार पुनरागन कर!", असा प्रेरणादायी संदेश तिने हसन अलीला दिला.

हेही वाचा: Bye Bye Pakistan ट्विटरवर ट्रेंडिंग.. पाहा भन्नाट विनोदी मीम्स

नक्की काय घडलं?

सामन्याच्या १९व्या षटकात ऑस्ट्रेलियाला १२ चेंडूत २२ धावांची गरज होती. पहिल्या दोन चेंडूत केवळ २ धावा आल्या. त्यानंतर तिसरा चेंडू मॅथ्यू वेडने हवेत उडवला. त्यावेळी हसन अलीने तो झेल सोडला आणि त्या चेंडूवर आणखी दोन धावा मिळाल्या. या चेंडूनंतर ऑस्ट्रेलियाला ९ चेंडूत १८ धावांची आवश्यकता होती. शाहीन आफ्रिदीच्या वेगवान माऱ्यापुढे हे लक्ष्य साध्य करणं खूप कठीण होतं. पण वेडने पुढील तीन चेंडूंवर तीन षटकार खेचत पूर्ण षटक राखून सामना खिशात घातला आणि संघाला फायनलचे तिकीट मिळवून दिले.

loading image
go to top