Kane Williamson Unlucky | न्यूझीलंड हरलं अन् केन विल्यमसनचा भला मोठा पराक्रम हुकला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kane-Williamson-Sad

कर्णधार केन विल्यमसनने आपल्या संघाचे दमदार नेतृत्व केले, पण...

न्यूझीलंड हरलं अन् केन विल्यमसनचा भला मोठा पराक्रम हुकला!

NZ vs AUS, T20 World Cup Final: टी२० क्रिकेटला रविवारी एक नवा विश्वविजेता मिळाला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाने तुल्यबळ न्यूझीलंडला ८ गडी राखून पराभूत केले आणि पहिल्यांदा टी२० विश्वचषक करंडकावर आपलं नाव कोरलं. न्यूझीलंडने कर्णधार विल्यमसनच्या धडाकेबाज ८७ धावांच्या जोरावर २० षटकात १७२ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर मिचेल मार्शच्या नाबाद ७७ धावा आणि डेव्हिड वॉर्नरची ५३ धावांची तडाखेबाज खेळी याच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ७ चेंडू राखून सामना जिंकला आणि विजेतेपद पटकावले. पण न्यूझीलंडच्या पराभवामुळे केन विल्यमसनच्या हातून एक भला मोठा पराक्रम होता होता राहिला.

हेही वाचा: किवींचा पुन्हा ये रे माझ्या मागल्या शो; कांगारु टी-20 चॅम्पियन!

केन विल्यमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंडने २०२१ मध्ये जून महिन्यात कसोटी विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. त्यांनी टीम इंडियाला पराभूत करत पहिल्यावहिल्या कसोटी विश्वकरंडकावर आपलं नाव कोरलं होतं. याच वर्षी पुन्हा एकदा टी२० विश्वचषक स्पर्धेत विल्यमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंड अंतिम सामन्यात पोहोचलं होतं. जर न्यूझीलंडचा संघ आजचा सामना जिंकला असता. तर एकाच वर्षी दोन विश्वविजेतेपदं मिळवणारा कर्णधार म्हणून केन विल्यमसनचा गौरव झाला असता. आतापर्यंत २००७ वगळता कधीही एकाच वर्षांत ICCच्या विश्वचषक स्पर्धा आयोजित झालेल्या नाहीत. २००७ मध्ये वन डे विश्वचषक ऑस्ट्रेलियाने तर टी२० विश्वचषक भारताने जिंकला होता. यंदाच्या वर्षी विल्यमसनला भला मोठा पराक्रम करण्याची संधी होती, पण दुर्दैवाने ही संधी हुकली.

हेही वाचा: Video: विल्यमसनचा 'बाएं हाथ का खेल'... लगावला एकहाती षटकार!

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजी दिली. न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टीलने संथगतीने २८ धावा केल्या. इतर कोणालाही मोठी खेळी उभारता आली नाही. पण केन विल्यमसनने कर्णधारपदाला साजेशी ४८ चेंडूत ८७ धावांची खेळी केली आणि संघाला १७२ धावांचा टप्पा गाठून दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्वस्तात बाद झाला. पण डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल स्टार्क या जोडीने ९२ धावांची भागीदारी करून संघाला भक्कम स्थितीत नेले. वॉर्नर ५३ धावांवर बाद झाल्यावर मॅक्सवेलच्या साथीने मार्शने डाव पुढे नेला. अखेर नाबाद ७७ धावांची खेळी करत मार्शने संघाला पहिला टी२० विश्वचषक मिळवून दिला.

loading image
go to top