T20 WC: पाकची माजी कर्णधार म्हणते, "टीम इंडिया..." | Team India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sana-Mir-Virat-Kohli-Team-India

PAK vs IND: पाकिस्तानविरूद्ध भारताच्या संघाचा झाला मोठा पराभव

T20 WC: पाकची माजी कर्णधार म्हणते, "टीम इंडिया..."

IND vs PAK, T20 World Cup 2021: भारतीय संघाचा टी२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने (IND vs PAK) १० गडी राखून दणदणीत पराभव केला. पाकिस्तानच्या संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत आजपर्यंत १२ वेळा भारताकडून सपाटून मार खाल्ला होता. मात्र कालच्या सामन्यात पाकिस्तानने सव्याज परतफेड केली. विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधारपदाला साजेशी खेळी करत ५७ धावा केल्या आणि संघाला १५१ धावांपर्यंत पोहोचवले. हे आव्हान पाकिस्तानच्या संघाने एकही गडी बाद न होऊ देता सहज पार केलं. पाककडून भारताचा दारूण पराभव झाला असला तरी पाकिस्तानची माजी कर्णधार सना मीर (Sana Mir) हिने टीम इंडिया नक्कीच दमदार पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त केला.

"भारतीय संघ पाकिस्तानशी मोठ्या फरकाने पराभूत झाला असला तरीही टीम इंडिया दणदणीत विजयासह पुनरागमन करेल असा मला विश्वास आहे. असं लवकरच घडलं तर त्यात आश्चर्य वाटून घेण्यासारखं काहीच नाही. मला तर असंही वाटतं की याच स्पर्धेत पुन्हा एकदा पाकिस्तान आणि भारत यांच्यात एक क्रिकेट सामना होऊ शकतो", असं मत तिने ICC च्या अधिकृत वेबसाईटवर आपल्या स्तंभात मांडलं.

यंदाच्या स्पर्धेत दोन गटात स्पर्धा सुरू आहे. एका गटातील दोन संघ केवळ एकदाच आमनेसामने येऊ शकतात. त्यानंतर ते दोन संघ समोरासमोर आले तर ते केवळ फायनल सामन्यातच शक्य आहे. त्यामुळे सना मीरच्या वाक्याचा व्यापक अर्थ काढायचा झाला तर भारत-पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होऊ शकतो, असं तिचं मत आहे.

"विराट कोहली पाकिस्तान विरूद्धच्या पराभवाला धाडसाने सामोरा गेला. तसंच सामना संपल्यानंतर त्याने जी खिलाडूवृत्तीसाठी दाखवली, त्याचं कौतुक वाटतं. विराट कोहलीसारखा खेळाडू हा महान क्रिकेटर्सपैकी एक आहे. तो अनेकांचा आदर्श आहे. त्यामुळे अशा खेळाडूंनी या पद्धतीची वर्तणूक करून दुसऱ्यांसमोर आदर्श घालून देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरोधात मोठा पराभव पचवण्यासाठी धाडस लागतं. टीम इंडियाने पाकविरूद्धचा पराभव चांगल्या पद्धतीने हाताळला. त्या अर्थी त्यांच्या संघात स्थैर्य आहे असं दिसून येतं. तसंच, भारताचा संघ नक्कीच दमदार पुनरागमन करेल याचा विश्वास त्यांच्या संघाला आहे असंही दिसतं", असं सना मीरने नमूद केलं.