T20 WC : भेदरुन बसलेल्या 'कांगारूंची लांब उडी'.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Australia Cricket Team
T20 WC : भेदरुन बसलेल्या 'कांगारूंची लांब उडी'....

T20 WC : भेदरुन बसलेल्या 'कांगारूंची लांब उडी'....

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्यापेक्षा कमकवुत मानल्या जाणाऱ्या संघांकडून पराभवाचा दणका बसला. कर्णधार फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाची अवस्था लाखाचं बारा हजार होतायेत का? अशीच झाली होती. त्यामुळेच 2015 मध्ये पाचव्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघ टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत हवा करेल, असे कुणी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. पण पिवळ्या जर्सीतील धमक पुन्हा दिसली. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला शह देत पहिला वहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला.

ऑस्ट्रेलियन संघाने वनडे वर्ल्ड कपच्या हॅटट्रिकसह पाच वेळा जेतेपद मिळवून क्रिकेट जगतात आपला दबदबा दाखवून दिलाय. ही गोष्ट सर्वांनाच ठावूक आहे. पिवळ्या जर्सीतील ती धमक अचानक गायब झाल्याचे दिसले. क्रिकेटच्या मैदानात उतरल्यावर प्रतिस्पर्धी संघाला हबकी भरवणारी टीम मागील काही काळात टी-20 क्रिकेटमध्ये सपाटून मार खाताना दिसली. कोरोनामुळं स्कॉटलंड विरुद्धचा त्यांचा एकमेव सामना रद्द झाला.

हेही वाचा: ज्याच्या बायकोनं खाल्ल्या शिव्या, त्यानंच ऑस्ट्रेलियाला दाखवले 'अच्छे दिन'

कोरोनातून सावरताना इंग्लंड विरुद्धच्या दौऱ्यानं ऑस्ट्रेलियानं पुन्हा क्रिकेटला सुरुवात केली. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकूनही ऑस्ट्रेलियाने ही मालिका गमावली. इंग्लंडने घरच्या मैदानात 2-1 अशी बाजी मारली. शेवटी इंग्लंड असल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा हा पराभव फार जिव्हारी लागणार नव्हता. पण यातून संघ सावरलाच नाही. भारतीय संघाने घरात घुसून त्यांच्या बत्या गुल केल्या. तीन सामन्यांच्या मालिकेत पुन्हा ऑस्ट्रेलियावर घरच्या मैदानात 2-1 अशा पराभवाला सामोरे जावे लागले. पुढे न्यूझीलंडमध्ये जाऊनही त्यांनी मार खाल्ला.

हेही वाचा: वॉर्नरच्या पत्नीचे तीन शब्द... ट्रोलर्सची केली बोलती बंद!

वेस्ट इंडीज आणि बांगलादेशमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळला. कॅरेबियन ताफ्यानं त्यांचा 4-1 असा पराभव करुन ऑस्ट्रेलियन राज्य खालसा झाल्याचा जणू इशाराच दिला. बांगलादेशच्या संघानंही त्यांची हालत बिकट केली. इथही ऑस्ट्रेलियाने मोठ्या पराभवाचा सामना केला. त्यामुळे यंदाच्या टी-20 स्पर्धेतील प्रबळ दावेदारीतून ऑस्ट्रेलियाचा संघ कधीच बाहेर फेकला होता. फिंचलाही आपण काही चमत्कार करु असे वाटले नसेल.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी खेळलेल्या पाच टी-20 मालिकेतील निकाल हा कांगारु गांगरलेले आहेत, अशीच काहीशी परिस्थिती दिसत होती. त्यामुळेच यंदाच्या स्पर्धेतील विजेता म्हणून त्यांच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नव्हतं. कांगारु हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन संघालाही कांगारु असे संबोधतात. या प्राण्याची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यातील पहिली गोष्ट ही की तो फक्त ऑस्ट्रेलियात आढळतो. दुसरी गोष्ट इतर प्राण्याप्रमाणे चार पायावर हा प्राणी चालत नाही तर थेट उड्या मारतो. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत कांगारुंनी असंच काहीतरी केलं.

कांगारु या प्राण्याच आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे ते ग्रुपनं राहतात. आणि एकमेकांचे रक्षण करणं कर्तव्य मानतात. धोका जाणवत असेल तर इतर साथीदारांना सावध करण्यासाठी ते आपले पाय जोराने आपटतात. क्रिकेटच्या मैदानातील कांगारुंच्यातही हाच गुण पुन्हा अनुभवायला मिळाला. मग तुम्ही स्लेजिंग म्हणा किंवा सेमी फायनलच्या लढतीत अडचणीत असताना वॉर्नरनं पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद हाफिजच्या दोन टप्पी चेंडूवर केलेला प्रहार म्हणा....हा कदाचित याच गुणातून आला असेल. दक्षिण आफ्रिकेतील बॉल टेम्परिंग प्रकरणात स्मिथ अन् वॉर्नर दोषी आढळले. दोघे शिक्षा भोगून पुन्हा संघाला जॉईन झाले. याप्रकरणानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये झालेली खांदे पालट अन् संघातील अस्थिरता यामुळे संघ कुठेतरी गांगरला होता. पण आज स्मिथ-वॉर्नरच्या साथीनं फिंचनं ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील गायब झालेले अच्छे दिन पुन्हा आल्याचे संकेतच दिले आहेत.

loading image
go to top