
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी या कसोटी मालिकेचा दुसरा सामना खेळण्यासाठी भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ सज्ज आहेत. पहिल्या कसोटीत इंग्लंडने हेडिंग्लेमध्ये ५ विकेट्सने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती.
त्या सामन्यानंतर दुसऱ्या कसोटीआधी दोन्ही संघांना आठवडाभराचा कालावधी तयारीसाठी मिळाला आहे. त्यामुळे आता दोन्ही संघ बुधवारपासून (२ जुलै) सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत विजयासाठी उत्सुक आहेत.
दरम्यान, दुसऱ्या सामन्याआधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याने संघातील खेळाडू आठवडाभरानंतर ताजेतवाने असल्याचे सांगितले. याशिवाय जोफ्रा आर्चरला जरी दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नसले तरी त्याचं संघात पुनरागमन होणं महत्त्वाचं असल्याचेही स्टोक्सने स्पष्ट केले. स्टोक्सने भारतीय संघाबद्दलही भाष्य केले आहे.