
India vs Australia 4th Test Yashasvi Jaiswal Fifty : कोणाला आपला गमावलेला फॉर्म मिळवायचा असेल तर भारताविरुद्ध खेळा... ही अशी चर्चा होतेय कारण स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, ट्रॅव्हिस हेड यांची फलंदाजी दमदार झालेली पाहायला मिळतेय. बॉक्सिंग डे कसोटीत भारताची प्लेइंग इलेव्हनची निवड पुन्हा चुकलेली पाहायला मिळतेय. जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर गोलंदाजीचा सर्व भार पडलेला पुन्हा एकदा दिसला आणि म्हणूनच ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा उभ्या केल्या आहेत. फलंदाजांना पोषक खेळपट्टीवर भारताकडूनही तसेच प्रत्युत्तर अपेक्षित होते, परंतु रोहित शर्माने अपयशाचा पाढा गिरवला आणि लोकेश राहुल ऑसी कर्णधार पॅट कमिन्सच्या अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत झाला. २२ वर्षीय यशस्वी जैस्वाल मात्र ऑसी माऱ्यासमोर उभा राहिला आहे आणि त्याने अर्धशतक झळकावताना अनेक दिग्गजांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.